अभिनेत्री तनुश्री दत्ताची छोटी बहीण इशिता दत्ताने २८ नोव्हेंबरला अभिनेता वत्सल सेठसोबत लग्न केले. अगदी जवळच्याच नातेवाईक आणि मित्र परिवारामध्ये हा सोहळा पार पडला. इशिता आणि वत्सलचे लग्न हे जसे त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक गोष्ट होती तशीच त्यांच्या लग्नातील अजून एका गोष्टीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या लहान बहिणीच्या लग्नात तनुश्री गैरहजर होती. त्यामुळे तनुश्री आणि इशितामध्ये काही कारणांमुळे दुरावा निर्माण झाला आहे का, असाच प्रश्न आता साऱ्यांना पडत आहे.
लग्नात तनुश्री गैरहजर असल्याचे नक्की कारण काय असेल याचाच शोध आता घेतला जात आहे. काही रिपोर्ट्सनुसार, तनुश्रीला बॉलिवूडमधील एकाही व्यक्तीला भेटावे असे वाटत नाही. म्हणूनच तिने बहिणीच्या लग्नात येणेही टाळले. तर काहींच्या मते, तनुश्री कोणत्यातरी यात्रेला गेली आहे. तिने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे ती बहुतांश वेळ फिरतीवरच असते.
तनुश्री सध्या अमेरिकेत राहते. इशिताही दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेत बहिणीबरोबर वेळ घालवायला गेली होती. तनुश्रीने २००४ मध्ये मिस इंडिया युनिव्हर्स हा किताब जिंकला होता. ‘आशिक बनाया आपने’, ‘चॉकलेट’, ‘गुड बॉय बॅड बॉय’ या सिनेमांत काम केले. पण तिचं सिनेकरिअर अपेक्षेनुसार यशस्वी होऊ शकलं नाही.
वत्सल, इशितापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे. वत्सल आणि इशिताने लाइफ ओके वाहिनीवरील रिश्तों का सौदागर- बाजीगरमध्ये एकत्र काम केले होते. या मालिकेदरम्यान दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. वत्सल आणि इशिताच्या लग्नाला अजय देवगन, काजोल, बॉबी देओल आणि बॉलिवूड तसेच टॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती.
इशिताने आपल्या करिअरची सुरूवात २०१२ मध्ये तेलगू सिनेमांतून केली होती. इशिताने सिनेमांव्यतिरिक्त अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. १ डिसेंबरला तिचा कपिल शर्मासोबतचा फिरंगी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
