टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सर्वांनाच परिचित आहे. मालिकेतील विनोद, प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या भूमिका, उत्तम कथानक यांमुळे घरोघरी ही मालिका पाहिली जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक असतात. मालिकेची लोकप्रियता लक्षात घेता आपला प्रेक्षकवर्ग वाढवण्यासाठी निर्मात्यांनी तेलुगू भाषेतही मालिका आणण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलुगू भाषिकांना आता आपल्या मातृभाषेत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका पाहता येणार आहे. ‘तारक माम्मा अय्यो रामा’ असं तेलुगूतील मालिकेचं नाव असणार आहे. ई टीव्ही प्लस इंडिया या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. दररोज संध्याकाळी साडेसात वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

वाचा : पदवीधरालाच माझ्या घरी येण्यास परवानगी- शाहरूख 

याबाबत मालिकेचे निर्माते आसित मोदी म्हणाले की, ‘संपूर्ण उत्तर, पूर्व आणि पश्चिम भारतातील प्रेक्षकांची ही सर्वांत आवडती मालिका आहे. इतकंच नाही तर भारताबाहेर असलेले भारतीय आणि अन्य देशातील काही प्रेक्षकही ही मालिका आवर्जून बघतात. हलक्या फुलक्या विनोदातून हसवणारी ही मालिका पाहताना लोक स्वत:च्या चिंता विसरून जातात. आता तेलुगू भाषेच्या माध्यमातून आम्ही दक्षिण भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहोत. तिथेही ही मालिका हिंदीइतकीच लोकप्रिय होईल असा मला विश्वास आहे.’