टेलिव्हिजन विश्वात ‘पिंकी बुवा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री उपासना सिंग हिला एका विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. विनयभंगाचा प्रयत्न करणाऱ्या एका टॅक्सी चालकापासून तिने स्वत:चा जीव वाचवल्याचं वृत्त समोर आलं आहे. चंदिगडहून एका चित्रपटाच्या चित्रीकरणाहून परततना तिला या प्रसंगाचा सामना करावा लागला. पण, वेळीच टॅक्सी चालकाच्या चुकीच्या वागण्याचा अंदाज येताच समयसूचकतेमुळे काहीही चुकीची गोष्ट घडलेली नाही.

११ मार्चला उपासनाला या प्रसांगाला सामोरं जावं लागलं होतं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना तिने याविषयीचा खुलासा करत त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याचा उलगडा केला. ‘त्यावेळी मी चित्रीकरण संपल्यानंतर हॉटेलवर परतत होते. माझ्यासोबत स्टाफची दोन लोकंही होती. दररोज सेटपासून हॉटेलवर पोहोचण्यासाठी आम्हाला साधारण ४५ मिनिटं लागायची. पण, त्यावेळी आमची कार बराच वेळ झाला तरीही रस्त्यावरच चालत होती. हॉटेलवर पोहोचण्यासाठी नेमका इतका वेळ का लागतोय, हे जाणून घेण्यासाठी म्हणून मी चालकाला आणखी किती वेळ लागणार, असं विचारलं. त्यावर आणखी १४ किलोमीटरचा रस्ता आहे असं उत्तर त्याने दिलं. त्यावेळी काहीतरी चुकतंय याचा अंदाज मला आला आणि मी तात्काळ त्याला टॅक्सी थांबवण्यास सांगितली. पण, त्याने माझं बोलणं एकलंच नाही. आवाज चढवल्यानंतर मग कुठे त्याने टॅक्सी थांबवली. मी त्याच्याकडे टॅक्सी चालवण्यासाठी चावी मागितली तर त्याने ती देण्यास नकार देत टॅक्सीच्या बॅटरीजवळ काहीतरी खुरापत केली’, असं उपासनाने सांगितलं.

वाचा : इन्स्टाग्राम पोस्टमधून प्रिया वारियरची जबरदस्त कमाई

टॅक्सी चालकाच्या या अशा वागण्यामुळे उपासनाने सावधगिरी म्हणून तिच्या घरच्यांना आणि चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमला फोन करत याविषयीची माहिती दिली. त्याचवेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने उपासनाला ओळखलं आणि तिची मदत केली. त्याच व्यक्तीच्या मदतीने उपासनाने पोलिसांना बोलवून विनयभंगाचा प्रयत्न करणाऱ्या त्या टॅक्सी चालकाला धडा शिकवला.

वाचा : टीकाकारांकडे मी लक्षच देत नाही- राधिका आपटे

पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यानंतर तिने त्या चालकाची तक्रारही केली. पण, लिखित स्वरुपात त्याने उपासनाची माफी मागितल्यानंतर तिने तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्या चालकाला त्याची शिक्षा मिळाली आहे, त्यामुळे तक्रार करुन टॅक्सीच्या मुळ मालकाला या प्रकरणामुळे उगाचच त्रास होऊ नये, या उद्देशाने तिने ही तक्रार मागे घेतली.