सिनेसृष्टीत स्त्रियांच्या सुडौल व मादक शरीराला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे अनेक अभिनेत्री मादकता प्राप्त करण्यासाठी योग्य आहार, व्यायाम व सौंदर्यप्रसाधनांवर लाखो रुपये खर्च करतात. परंतु कितीही प्रयत्न केला तरी निसर्ग नियमानुसार माणसाला त्याचे तारुण्य काही दीर्घकाळ टिकवून ठेवता येत नाही. असाच काहीसा प्रकार अभिनेत्रींच्या बाबतीतही होतो. वाढत्या वयानुसार त्यांच्या मादकतेचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. परिणामी त्यांना मिळणारे कामही कमी कमी होत जाते. त्यामुळे उत्तम अभिनय करण्याची क्षमता असलेल्या अभिनेत्रींनाही बऱ्याचदा दुय्यम दर्जाच्या भूमिका कराव्या लागतात. काही जण असतात, ज्या संघर्ष करण्याचा निश्चय करतात आणि शरीरात आवश्यक ते बदल घडवून आणण्यासाठी कॉस्मेटिक शस्त्रक्रियेची मदत घेतात.

आजवर रेनी झेलवेगर, डायान क्रुगर, केट बेकिन्सेल, स्कार्लेट जॉन्सन, लेडी गागा यांसारख्या शेकडो अभिनेत्रींनी कॉस्मेटिक शस्त्रक्रियांच्या मदतीने आपले तारुण्य टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. या सिनेकलाकारांच्या जीवनशैलीचे जनसामान्यांना प्रचंड आकर्षण असते. ते त्यांचे सातत्याने अनुकरण करतात. काही चाहत्यांवर तर हा प्रभाव इतका जबरदस्त असतो की ते आपल्या आवडत्या कलाकाराप्रमाणे दिसण्यासाठी कोणत्याही थराला जातात. असाच काहीसा अनुभव सध्या समाजमाध्यमांवर येतो आहे. इराणमधील एका १९ वर्षीय तरुणीने हुबेहूब अभिनेत्री अँजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी चेहऱ्यावर तब्बल पन्नास शस्त्रक्रिया केल्या आहेत. या तरुणीचे नाव सहार तबार असून ती लहानपणापासून अँजेलिना जोलीची जबरदस्त चाहती आहे.

तिला खूप मोठी आणि प्रसिद्ध अभिनेत्री बनायचे आहे. आणि त्यासाठी अँजेलिनाप्रमाणे दिसणे गरजेचे आहे. हा गैरसमज झाल्यामुळे सलग पन्नास शस्त्रक्रिया तिने आपल्या चेहऱ्यावर केल्या. परंतु कॉस्मेटिक शस्त्रक्रिया झेलण्याची मानवी शरीराची एक क्षमता असते. आणि त्या मर्यादेत राहूनच डॉक्टर या ट्रीटमेंट करण्याचा सल्ला पेशंटला देतात, परंतु काही हट्टी मंडळी या मर्यादांचे उल्लंघन करतात. परिणामी त्यांच्या वाटय़ाला वाईट अनुभव येतात, जे सध्या सहारच्या बाबतीत होत आहे. वेडाच्या भरात तिने एकामागून एक शस्त्रक्रिया केल्या. त्यासाठी विविध प्रकारची औषधे घेतली. आणि या सर्वाचा इतका वाईट परिणाम तिच्या चेहऱ्यावर झाला की आता ती एखाद्या भूतपटातील विद्रूप भुताप्रमाणे ती दिसते आहे. स्वत:हून तिने तिचे काही फोटो समाजमाध्यमांवर अपलोड केले. आणि त्याचबरोबर हजारो लोकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. अनेकांनी तिच्यावर विनोद केले. तर काहींनी दु:ख व्यक्त केले. परंतु तिने दिलेल्या प्रतिक्रिया पाहता अजूनही ‘अँजेलिना जोली’सारखा दिसण्याचा ध्यास सहार तबारने सोडला नसल्याचेच दिसून येत आहे.