कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर बरीच दालनं खुली होतात ही बाब नाकारता येणार नाही. आजवर बऱ्याच टेलिव्हिजन कलाकारांनी टेलिव्हिजन विश्वातून थेट चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आपल्या करिअरला नवं वळण दिल्याचं आपण आजवर पाहिलं आहे. या कलाकारांमध्ये आता अभिनेत्री अंकिता लोखंडेचासुद्धा समावेश झाला आहे. काही दिवसांपूर्वीच अंकिताच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चा रंगल्या होत्या. कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून अंकिता झळकणार आहे. या चित्रपटामागोमागच तिच्या वाट्याला आणखी एक चित्रपट आला आहे.
अंकिताने बॉलिवूडमधील तिचा दुसरा चित्रपट साइन केला असून या चित्रपटातून ती संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आगामी ‘तोरबाज’ या चित्रपटातून अंकिता संजूबाबासोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय दत्त या चित्रपटात सैन्यदल अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असून, डिसेंबर महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तानातील बालवयीन आत्मघातकी हल्लेखोरांभोवती चित्रपटाचं कथानक फिरणार असल्याचं म्हटलं जात आहे.
वाचा : ‘या’ अभिनेत्याची मुलगी शाहिद कपूरला मानत होती पती
यासंबंधी कोणतीच अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आली नसली तरीही कथानकाविषयीची ही माहिती पाहता चित्रपटाविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अंकिता प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत तिने साकारलेली भूमिका आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबतची तिची केमिस्ट्रीसुद्धा अनेकांचीच दाद मिळवून गेली होती. या मालिकेदरम्यानच सुशांत आणि अंकिता यांचं रिलेशनशिपही चर्चेचा विषय ठरलं होतं. बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनीही त्यांचं नातं इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अंकिताचं नाव टेलिव्हिजन अभिनेता कुशल टंडनसोबतच जोडलं गेल्याचं पाहायला मिळालं.