संकटं आली कि ती चारही बाजूने येतात आणि एखाद्याला पूर्णपणे भांडावून सोडतात हे खरंच आहे. विनोदवीर कपिल शर्माची परिस्थिती पाहता त्याला याचाच प्रत्यय सध्या येत असेल असं म्हणायला हरकत नाही. काही दिवसांपासून अडचणी आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कपिलच्या कलाविश्वातील अस्तित्वावरच आता सावट आल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कपिलने केलेल्या ट्विटमुळे आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे अनेकांनीच त्याच्यावर आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं.

एंटरटेंन्मेंट वेबसाइटचे संपादक असणाऱ्या विकी लालावानी यांना कपिलने शिवीगाळ केल्याचं या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळालं. ज्यानंतर त्याच्या या वर्तणूकीवर अनेकांनी नाराजीचा सूर आळवला. जिथे अनेकांनीच कपिलची साथ सोडण्याचा निर्णय घेतला तिथेच सध्याच्या घडीला त्याची प्रतिस्पर्धी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने मात्र त्याची पाठराखण केली आहे. सध्या शिल्पा आणि विनोदवीर सुनील ग्रोवर एका विनोदी वेब शोसाठी एकत्र काम करत असून, त्यांना प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे. मुख्य म्हणजे कपिलच्या नव्या शोची स्पर्धा असतानाही शिल्पा आणि सुनीलच्याच समीकरणाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. पण, या साऱ्यात तिने एक कलाकार म्हणूनही आपली जबाबदारी पार पाडली आहे. कपिलसमोरील सध्याची परिस्थिती पाहता त्याच्या समर्थनार्थ तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली असून, यात आपली बाजू स्पष्टपणे मांडली आहे. ‘कोणाला शिवीगाळ करणं चुकीचच आहे. पण, सर्वच कलाकारांना माहितीये की विकी लालवानी किती रटाळ प्रश्न विचारतात. मी सर्वच कलाकारांना विनंती करते की त्यांनीही सर्वांसमोर आपल्या अनुभवांचं कथन करावं. जागो आर्टीस्ट जागो’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं.

https://www.instagram.com/p/BhUf8pOgrGv/

वाचा : सेक्सी दुर्गा चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अन्यायाविरोधात पंतप्रधानांना पत्र

कपिलच्या अशा एकाएकी वागण्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पण, असं नेमकं का होत आहे याचा विचार केला गेला पाहिजे. कारण इतका प्रतिभावान कलाकार असं विचित्र का वागेल, हा महत्त्वाचा प्रश्नही तिने उपस्थित केला. ‘चुका या माणसांकडूनच होतात. उगवत्या सुर्याला तर सगळेच अभिवादन करतात’, असं सूचक विधानही तिने या पोस्टमधून केलं आहे. त्यासोबतच मागच्या सर्व गोष्टी विसरुन त्याला (कपिलला) क्षमा करण्याची विनंतीही तिने माध्यमांना केली आहे. कपिलची बाजू घेत शिल्पाने सर्वांना केलेली ही विनंती पाहता कलाविश्वात एकमेकांप्रती असणारा आदर आणि बांधिलकीच्या भावनेचं लगेचच दर्शन होतंय, असं म्हणायला हरकत नाही.