टेलिव्हिजन अभिनेत्री अलका कौशल यांना पंजाबच्या संगरुर न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ‘स्वरागिनी’ आणि ‘कुबूल है’ या मालिकांतून कौशल यांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. ‘अमर उजाला’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अॅड. सुखबीर सिंग यांनी यासंबंधीची माहिती दिली.

अलका आणि त्यांच्या आईने अवतार सिंग नावाच्या व्यक्तीकडून ५० लाख रुपये घेतले होते. मालिकेच्या निर्मितीचं कारण देत हे पैसे त्यांनी घेतले होते. ज्यावेळी अवतार सिंग यांनी त्यांचे पैसे परत मागितले, तेव्हा त्यांना २५- २५ लाखांचे दोन धनादेश देण्यात आले. पण, त्यांना देण्यात आलेले हे दोन्ही धनादेश बाऊंस झाले.

या सर्व प्रकारानंतर अवतार सिंग यांनी अलका आणि त्यांच्या आईविरोधात मलेरकोटला येथे गुन्हा दाखल केला. २०१५ मध्येच अलका आणि त्यांच्या आईला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण, त्यांनी या निर्णयाविरोधात संगरुर न्यायालयात याचिका दाखल केली. या अपीलाच्या माध्यमातून, आम्ही अवतारकडून पैसे घेतलेच नसल्याचं अल्का आणि त्यांच्या आईचं म्हणणं होतं. पण, याविषयीचा सखोल तपास करण्यात आल्यानंतर, अलका आणि त्यांच्या आईला या सर्व प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं असून, दिलेल्या शिक्षेचा आदेश कायम ठेवला आहे. पोलीस तपास आणि हाती आलेल्या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने अलका आणि त्यांच्या आईला दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

अलका कौशल हे नाव टेलिव्हिजन विश्वात नवं नाही. त्यांनी आजवर बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत. सलमान खान आणि करिना कपूर यांच्या भूमिका असणाऱ्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात त्यांनी करिनाच्या आईची भूमिका साकारली होती. त्याशिवाय कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘क्वीन’ या चित्रपटातही त्या झळकल्या होत्या.

वाचा : ‘या’ अभिनेत्याची मुलगी शाहिद कपूरला मानत होती पती