शरीरात होणारे अंतर्गत बदल कधीकधी एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे बदलण्यास भाग पाडतात. या बदलांमुळे कधीकधी त्या व्यक्तीला अनेकांच्या विरोधाचाही सामना करावा लागतो. अशीच काहीशी कहाणी आहे, गौरी अरोरा हिची. ‘स्प्लिट्सव्हिला’ या रिअॅलिटी शोमध्ये गौरव अरोरा या नावाने स्पर्धक म्हणून आलेला ‘तो’ आज पूर्णपणे बदलला असून, लिंगबदल करुन त्याने स्वत:ची नवी ओळख प्रस्थापित केली आहे. इतकेच नव्हे तर नुकतेच त्याने ‘इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल’ या कार्यक्रमामध्ये स्पर्धक म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळच्या ऑडिशनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे.
‘इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल’च्या या ऑडिशनचा व्हिडिओ ‘एमटीव्ही इंडिया’च्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला. ज्यावेळी पुढील स्पर्धकाला आत पाठवण्यात यावे, असे परिक्षकांनी सांगितले तेव्हा बिकिनीमध्ये गौरी अरोरा व्यासपीठावर आली. तिने स्वत:ची कहाणीही सर्वांना सांगितली. ‘स्त्री होणं ही एक प्रकारची वेगळीच गोष्ट आहे. पण, मी स्वत:ला हे अस्तित्व भेट स्वरुपात दिले आहे’, असे म्हणत गौरीने तिची खरी ओळख सर्वांसमोर आणली. त्यावेळी आपण, गौरव अरोरा म्हणून ‘स्प्लिट्सव्हिला ‘या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्याचा खुलासाही तिने केला. गौरवपासून गौरी होण्यापर्यंतचा तिचा प्रवास ऐकून परिक्षक म्हणून बसलेले मलायका अरोरा, डब्बू रत्नानी, मिलिंद सोमणही थक्क झाल्याचे पाहायला मिळाले.
She had 8-pack abs, 16-inch biceps and everything a girl dreams of in a guy. Why do you think she chose to change her gender? Watch it here. pic.twitter.com/HMvMnqtHPW
— MTV India (@MTVIndia) October 25, 2017
वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा
एक मुलगा ज्यावेळी मुलीप्रमाणे वावरण्याची स्वप्नं पाहतो, तिच्याप्रमाणे होऊ पाहतो त्यावेळी त्याच्या मनात नेमक्या कोणत्या भावनांचे काहूर माजलेले असते, याचा अंदाज गौरीच्या बोलण्यातून येत होता. मुलगा असताना माझे एटपॅक अॅब्स आणि १६ इंचांचे बायसेप्स होते, असे गौरीने या ऑडिशनमध्ये स्पष्ट केले. आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात बदल केले असले तरी आताही बऱ्याचदा मला वावरताना संकोचलेपण वाटते, असेही तिने सांगितले. गौरव ते गौरी अशा संपूर्ण प्रवासात तिला सर्वात जास्त मदत झाली ती म्हणजे तिच्या वडिलांची. पालकांनी आपल्याला या संपूर्ण प्रवासात बरीच साथ दिली त्यामुळेच मला धीर मिळाला असे म्हणणारी गौरी परिक्षकांची मनं मात्र जिंकू शकली नाही. त्यामुळे या कार्यक्रमात तिचा प्रवास पहिल्या पायरीवरच थांबला. पण, या ऑडिशनच्या निमित्ताने सोशल मीडियावर मात्र गौरी पुन्हा चर्चेत आली हेच खरे.