टेलिव्हिजन विश्वात काही कार्यक्रमांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. अशाच काही कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ Taarak Mehta Ka Ooltah Chashmah. गेल्या कित्येक वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मुख्य म्हणजे दोन हजारहून जास्त भाग प्रसारित झालेल्या या मालिकेच्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. यामधील कलाकारांच्या धमाल अभिनय आणि त्यांच्या विनोदाचं अफलातून टायमिंग या गोष्टी म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा कणा आहेत असंच म्हणावं लागेल. अशा या मालिकेतीलच एक महत्त्वाचं पात्र म्हणजे जेठालाल गडा. ‘जेठालाल गडा’, ‘दया’ आणि त्यांच्या कुटुंबाभोवतीच या मालिकेचं कथानक फिरतं.

अभिनेता दिलीप जोशी यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत जेठालाल गडा ही व्यक्तीरेखा साकारली आहे. मुळात दिलीप यांना बरेचजण त्यांच्या खऱ्या नावापेक्षा ‘जेठालाल’ याच नावाने जास्त ओळखतात. या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यापूर्वी दिलीप जोशी यांनी एका बॉलिवूड चित्रपटातून सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्यासह बऱ्याच कलाकारांचा सहभाग असणारा हा चित्रपट आजही अनेकांच्या आवडीचाच आहे. तो चित्रपट म्हणजे ‘हम आपके है कौन’.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

या चित्रपटात त्यांनी कवी कालिदासाच्या योगदानाचा अभ्यास करणाऱ्या भोला प्रसादची भूमिका साकारली होती. फॅमिली ड्रामा प्रकारातील या चित्रपटामध्ये त्यांच्या विनोदी भूमिकेने अनेकांचीच दाद मिळवली होती. त्या चित्रपटानंतर दिलीप जोशी चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. पण, त्यांच्या वाट्याला हवंतसं यश आलं नव्हतं. पण, त्यांचं नाव खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचलं ते म्हणजे ‘जेठालाल’ या भूमिकेमुळे.
बरीच वर्ष ‘तारक मेहता….’ या मालिकेत ‘जेठालाल’ची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांना दर दिवशी ५० हजार रुपये इतकं मानधन मिळतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. निर्मिती संस्थेशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार दिलीप एका महिन्यात जवळपास २५ दिवस चित्रीकरण करतात. त्यामुळे महिन्याला त्यांच्या मानधनाचा आकडा १२ ते १३ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. सलमान सोबत स्क्रीन शेअर करणारा हा अभिनेता उत्तम नकलाकारही आहे. त्यांच्या याच कलागुणांमुळे त्यांनी अभिनय क्षेत्राची वाट धरली होती.