कॉमेडियन कपिल शर्माच्या मागच्या अडचणी काही केल्या संपण्याचं नावच घेत नाहीयेत. सहकलाकारांसोबतचा वाद, तब्बेतीच्या अडचणी या सर्व गोष्टींतून कुठे कपिलचा शो टीआरपी रेटिंगमध्ये डोकं वर काढण्याचा प्रयत्न करत होता तोच पुन्हा एकदा त्याच्या वाट्याला आणखी एक अडचण आली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार ‘मुबारका’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कपिलच्या शोमध्ये गेलेल्या अभिनेता अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूज आणि अथिया शेट्टी या कलाकारांना कपिलने बराच वेळ ताटकळत ठेवलं होतं. त्यामुळे चित्रपटाचं प्रमोशन न करताच मुबारकाची टीम कपिल शर्माच्या सेटवरुन निघून गेली.

कपिलची तब्येत ठीक नसल्याचं कारण देत या क्रायक्रमाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं. तो काही वेळातच येईल असं सांगत या चित्रपटाच्या टीमला तब्बल चार तास वाट पाहायला लावली. त्यामुळे बराच वेळ ताटकळल्यानंतर ‘मुबारका’च्या संपूर्ण स्टारकास्टने चित्रपटाचं प्रमोशन न करताच परतण्याचा निर्णय घेतला. कपिल शर्मा शोसोबत संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मुबारका’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अभिनेता अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूज आणि अथिया शेट्टी या कलाकारांनी हजेरी लावली होती. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरु होणार होतं. पण, तेव्हापर्यंत कपिल काही सेटवर पोहोचला नाही. त्यानंतर बऱ्याचदा त्याच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. त्याचवेळी हाती आलेल्या माहितीनुसार कपिलची तब्येत ठीक नसल्याचं चित्रपटाच्या टीमला सांगण्यात आलं.

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट

कपिलच्या तब्येतीचं कारण देत त्याच्या टीमने कार्यक्रमाच्या त्या भागाचं चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला, इतकच काय तर त्याने रात्री १० वाजेपर्यंत तो येण्याची वाटही पाहिली. पण, कपिल सेटवर न आल्यामुळे चित्रीकरण झालंच नाही. विनोदवीर कपिल शर्माच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींना अशी वाट पाहात ताटकळत राहण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. याआधीसुद्धा बऱ्याच कलाकारांना त्याने वाट पाहायला लावलं होतं.

Story img Loader