९०च्या दशकातील मुला-मुलींच्या आवडत्या मालिका कोणत्या असा प्रश्न केल्यास अर्थातच ‘शक्तिमान’ या मालिकेचं नाव न चूकता घेण्यात येतं. शक्तिमानच्या भूमिकेने अभिनेता मुकेश खन्ना यांना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचवले. त्यांनी संपूर्ण कारकिर्दीत साकारलेल्या भूमिकांमध्ये ‘शक्तिमान’ ही व्यक्तिरेखा त्यांच्या करिअरसाठी महत्त्वाची ठरली. नुकताच या अभिनेत्याने ५९वा वाढदिवस साजरा केला.

याआधी बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेमधील भीष्म पितामह या भूमिकेने मुकेश खन्ना यांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. भीष्म पितामहच्या व्यक्तिरेखेत त्यांनी आजन्म अविवाहीत राहण्याची शपथ घेतली होती. रील लाइफमधील ही शपथ या अभिनेत्याने बहुधा रिअल लाइफमध्येही घेतल्याचे दिसते. कारण, आता मुकेश खन्ना वयाच्या साठीत असून त्यांनी अद्याप लग्न केलेलं नाही. इतकंच काय पण एवढ्या वर्षांमध्ये त्यांचं कोणत्याही अभिनेत्रीसोबत नावसुद्धा जोडलं गेलं नाही. आपल्या कामाप्रती एकनिष्ठ असलेल्या मुकेश यांनी त्यांच्या करिअरसाठी संपूर्ण आयुष्य वाहिले. त्यासाठी त्यांनी वैयक्तिक आयुष्याकडे पूर्णपणे कानाडोळा केला.

वाचा : सारा- हर्षवर्धनच्या डेटिंगला परवानगी दिल्यामुळे करिनावर अमृता नाराज

अभिनयाव्यतिरीक्त त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मतीदेखील केली. तसेच, ते राजकारणातही कार्यरत होते. त्यांनी ‘चंद्रकांता’, ‘युग’, ‘ब्रह्मा’, ‘एहसास’ आणि ‘मर्यादा’ या मालिकांमध्येही काम केले होते. गेल्या काही वर्षांपासून टेलिव्हिजन जगतापासून दुरावलेले मुकेश आता पुढच्या पिढीला अभिनयाचे प्रशिक्षण देण्याचे काम करतात. ते ‘चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’चे अध्यक्षही आहेत. अभिनयासाठी एक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

वाचा : अखेर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील पोपटलाल अडकणार लग्नाच्या बेडीत?

एक वेळ अशी होती जेव्हा मुकेश खन्ना यांचे स्टारडम इतर अभिनेत्यांवर भारी पडले होते. या अभिनेत्याने साकारलेली प्रत्येक भूमिका लोकप्रिय होत होती, मग ती भीष्म पितामहची भूमिका असो वा शक्तिमान किंवा आर्यमान…. प्रत्येक भूमिकेत त्यांनी प्राण ओतला होता. पण त्यांच्या शक्तिमानसाठी असलेली लोकांची क्रेज इतर कोणत्या भूमिकेसाठी क्वचितच दिसली असेल.