अभिनेत्री स्वरा भास्करवर सोशल मीडियातून आक्षेपार्ह टिप्पणी करणं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला चांगलंच महागात पडलं होतं. स्वरा आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी अग्निहोत्रीचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं होतं. त्यावर आता माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याबद्दल धन्यवाद, असं म्हणत विवेक अग्निहोत्रीने स्वराला टोमणा मारला आहे.

केरळचे अपक्ष आमदार पी. सी. जॉर्ज यांनी न्यायाची मागणी करणाऱ्या एका बलात्कार पीडित ननविरोधात अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. पीडितेने केलेल्या बलात्काराच्या आरोपांवर शंका उपस्थित करताना जॉर्ज यांनी त्या पीडितेलाच वेश्या असं म्हटलं. स्वरा भास्करने जॉर्ज यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला होता. ‘अत्यंत लज्जास्पद. भारताच्या राजकीय आणि धार्मिक विभाजनावर उपस्थित असलेला हा मळका तवंग आहे. खरंच घृणास्पद वक्तव्य आहे,’ अशा शब्दांत स्वराने फटकारलं.

स्वराच्या या ट्विटवर व्यक्त होताना विवेक अग्निहोत्रीचा तोल गेला. लैंगिक अत्याचाराविरोधातील #मीटू मोहिमेशी संदर्भ जोडत अग्निहोत्रीने ‘फलक कुठे आहे? #MeTooProstituteNun?,’ असं ट्विट केलं. या आक्षेपार्ह ट्विटवर स्वरा भडकली. यानंतर स्वरा आणि विवेक यांच्यात चांगलंच वाक्युद्ध रंगलं. अखेर स्वराने ट्विटरकडे याविरोधात तक्रार नोंदवली. स्वराच्या तक्रारीची दखल घेत ट्विटरने विवेक अग्निहोत्रीचे अकाऊंट ब्लॉक केले. ट्विटरच्या नियमांचं योग्य पालन केल्यास तो अकाऊंट पुन्हा चालू करण्यात येतो.

वाचा : ‘मनमर्जियां’ पाहिल्यानंतर बिग बींनी का टाळलं अभिषेकशी बोलणं?

अग्निहोत्रींचा अकाऊंट चालू झाल्यानंतर त्यांनी ट्विटच्या माध्यमातून स्वराला टोमणा मारला. ‘माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याबद्दल धन्यवाद. तू खरंच अत्यंत उदारमतवादी आहेस. यामुळे मला भारताच्या शूत्रंना मात देण्यासाठी आणखी प्रेरणा मिळाली. गेल्या वेळी जेएनयू JNU मध्ये तुझ्या आईने माझ्या चित्रपटाला विरोध केला होता आणि त्याचा परिणाम काय झाला ते तुला चांगलंच माहित आहे. आमच्या भांडणाला पुनरुज्जीवन दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार,’ असं ट्विट अग्निहोत्रीने केलं. आता यावर स्वरा काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.