कलाविश्वासोबतच राजकीयदृष्ट्याही ज्या चित्रपटावर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत तो म्हणजे ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या दोघांकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार असल्याचे सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर चित्रपटाते निर्माते सुनिल बोहरा यांना मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींसोबतच इतर त्या सर्व राज्यकर्त्यांची ना हरकत प्रमाणपत्र घ्यावी लागणार ज्यांच्या व्यक्तिरेखा या चित्रपटात दाखविल्या जाणार आहेत, असे देखील निहलानी यांनी बजावले आहे. या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे आणि त्यांना कोणताही पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा : अरे, हाच का तो ‘बाहुबली’मधला प्रभास!

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून पहलाज निहलानी यांची कारकीर्द जानेवारी २०१८ मध्ये संपणार आहे आणि हा चित्रपट त्यानंतर प्रदर्शित होणार असला तरीही बायोपिक संदर्भातील नियम बदलणार नसल्याची खात्री आहे असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले. ‘अनुपम खेर हे स्वत: माजी सेन्सॉर बोर्ड अध्यक्ष होते. अशोक पंडित जे स्वत:ला सेन्सॉर बोर्डाचे एक भाग समजतात त्यांचासुद्धा या चित्रपटामध्ये सहभाग आहे. मग अशा वेळी बायोपिकमध्ये ज्या खऱ्या व्यक्तिरेखा दाखवण्यात येणार आहेत त्या व्यक्तींकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते हे यांना कसे माहित नाही?’ असा प्रतिप्रश्नसुद्धा निहलानी यांनी केला.

वाचा : गायक-संगीतकार हिमेश रेशमियाचा घटस्फोट

अनुपम खेर निभावत असलेल्या भूमिकेविषयी निहलानी यांना विचारले असता, ‘अनुपम खेर यांना मनमोहन सिंग यांची भूमिका साकारताना पाहून मला आनंद झाला असून ते भूमिकेला पूर्ण न्याय देतील. यात संवादापेक्षा हावभावांवरच जास्त भर असेल कारण मनमोहन सिंग हे खूपच कमी बोलतात हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे आणि त्यामुळेच संवाद लेखकाचे त्यांच्या भूमिकेसाठी जास्त योगदान नसेलच याची मला खात्री आहे.’ असे ते म्हणाले.