हिंदी चित्रपटसृष्टीत पडद्यावर विविध भूमिकांना न्याय देणारा राजश्री बॅनरचा हक्काचा हिरो म्हणजे अभिनेता सलमान खान. प्रेम ही भूमिका जणू काही सलमानसाठीच बनली असावी. सलमान खानच्या चित्रपटांमध्ये त्याच्यासोबत झळकलेल्या अभिनेत्रीही बऱ्याच चर्चेचा विषय ठरल्या होत्या. या अभिनेत्री चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे दबंग अभिनेत्याच्या आणि त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्रींच्या वयात असलेलं अंतर. कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाइट’ या चित्रपटातून सलमान ९६ व्या वेळेस त्याच्याहून लहान अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर करत आहे.

वयाच्या २३ व्या वर्षी १९८८ मध्ये ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या सलमानने आजच्या घडीलाही प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. या चित्रपटात ‘विकी भंडारी’ची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सलमानने त्याच्याच वयाच्या रेणू आर्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटानंतर सलमानने ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून स्क्रीन शेअर केली. त्यावेळी सलमान २३ वर्षांचा आणि भाग्यश्री २० वर्षांची होती.

२००० सालानंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये सलमान आणि त्याच्या अभिनेत्रींच्या वयामध्ये बराच फरक पाहायला मिळाला. ‘चंद्र मुखी’ आणि ‘चाँद का तुकडा’ हे चित्रपट वगळता त्याच्या जवळपास सर्वच चित्रपटांमधील अभिनेत्री त्याच्यापेक्षा लहान होत्या. या दोन चित्रपटांमध्ये सलमानने अभिनेत्री श्रीदेवीसोबत स्क्रीन शेअर केली होती. श्रीदेवी त्याच्याहून वयाने २ वर्षांनी मोठी होती.

वाचा : Tubelight Review : …अखेर ‘ट्युबलाइट’ पेटली रेssss!

‘लकी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री स्नेहा उल्लाल चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी अवघी १७ वर्षांची होती. सलमानने आतापर्यंत स्क्रीन शेअर केलेल्या अभिनेत्रींमध्ये स्नेहा लर्वात लहान अभिनेत्री आहे. ‘तेरे नाम’ या चित्रपटातही सलमानसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या भूमिका चावलापासून ते कतरीना कैफ, सोनम कपूर, आयशा टाकिया, अनुष्का शर्मा, डेझी शाह या अभिनेत्रीही दबंग खानपेक्षा बऱ्याच लहान आहेत. ‘सुलतान’ या चित्रपटाच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करणाऱ्या अनुष्का आणि सलमानच्या वयात २२ वर्षांचं अंतर होतं.

वाचा : आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीला डेट करतोय हा स्टार किड 

चित्रपटातील अभिनेत्री आणि सलमानच्या वयात जवळपास १५ ते २० वर्षांचं अंतर असूनही त्याचा चित्रपटातील केमिस्ट्रीवर काहीच परिणाम झाला नाही. याउलट सलमानसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या बऱ्याच अभिनेत्री आज चित्रपटसृष्टीत स्वत:चा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. मुख्य म्हणजे या अभिनेत्रींपैकी काही जणींनी पदार्पणाच्या चित्रपटांतच या सुपरहिट अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे.