गेल्या काही दिवसांपासून ‘द फॅमिली मॅन-२’ या वेब सीरिजची सर्वत्र चर्चा आहे. या सीरिजच्या कथानकापासून ते कलाकारांपर्यंत रोज विविध गोष्टी समेर येत आहेत. या वेब सीरिजमधील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. या वेब सीरिजमधील मनोज वायपेयीच्या पत्नीची भूमिका साराकरणारी अभिनेत्री प्रिया मणि राज हिला देखील चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. अभिनेत्री प्रिया मणि राजने आजवर हिंदीसोबतच तामिळ, तेलगू आणि मल्यामळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र अभिनेत्री प्रिया मणि राजला देखील अनेकदा बॉडी शेमिंग आणि वर्ण भेदाचा सामना करावा लागल्याचं तिने नुकतच एका मुलाखतीत सांगितलं आहे.
अभिनेत्री प्रिया मणि राजला अनेकदा तिच्या रंगावरून वेगवेगळ्या कमेंटचा सामना करावा लागला आहे. नुकत्याच बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने या गोष्टीचा खुसाला केलाय. ती म्हणाली, “मला अनेकदा ट्रोल करण्यात आलंय. जेव्हा माझं वजन आतापेक्षा जास्त होतं तेव्हा अनेकजण मला मोटी, जाडी म्हणाले आहेत. तू खूप मोठी दिसतेस असं लोक म्हणायचे आणि जेव्हा आता मी बारिक झाले तेव्हा मी इतकी बारीक का झाले असा सवाल लोक विचारू लागले. एवढचं नाही तर तू आधी जशी होती तशीच छान दिसायची असे लोक म्हणू लागले.” असं प्रिया या मुलाखतीत म्हणाली.
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, “लोकांच्या या वेगवेगळ्या प्रतिक्रिया विचित्र होत्या. लोकांनी त्यांचे विचार बदलायला हवे. एका गोष्टीवर ठाम रहा. मी जाडं किंवा सडपातळ असणं ही माझी पसंती आहे. तुम्ही एखाद्याला जाडं आहे असं म्हणून बॉडी शेम कसं करू शकता?” असं म्हणत प्रिया मणिने नाराजी व्यक्त केली.
प्रिया मणि राजला कारावा लागला होता वर्णभेदाचा सामना
एवढचं नाही तर प्रियाला तिच्या रंगावरून अनेकदा वेगवेगळ्या कमेंटसचा सामना करावा लागल्याचं ती म्हणाली, “लोक म्हणायचे मी काळी दिसते. माझा चेहरा गोरा आणि मात्र माझे पाय काळे दिसतात असं ते म्हणायचे. मी म्हणायचे लोकांना झालंय तरी काय. जरी माझा रंग उजळ नसला तरी मला फरक पडत नाही. मी काळ्या रंगाची व्यक्ती असेलही तर तुमचे विचार बदला. काळ्या रंगाच्या व्यक्तीदेखील सुंदर असतात. भगवान कृष्णदेखील काळेच होते आणि ते सुंदरही होते. तुमच्या मनात जरी असे विचार असतील तर किमान ते न बोलता मनातच ठेवा. उगाच कुणी जाडं आहे किंवा काळं आहे असं म्हणून नकारात्मकता पसरवू नका.” असं प्रिया मणि राज म्हणाली.
‘द फॅमिली मॅन’ या दोन्ही सिझनमध्ये प्रिया मणि राजने एका पत्नी आणि आईची भूमिका साकारली आहे. ‘रावण’ या सिनेमातून प्रियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती ‘रक्त चरित्र 2’ आणि शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सिनेमात झळकली होती.