कॉमेडियन कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून आपल्या शोसाठी फार चिंतित होता. जेव्हापासून सुनील ग्रोवर, अली असगर, चंदन प्रभाकर, सुगंधा मिश्रा यांनी ‘द कपिल शर्मा शो’ सोडला तेव्हापासून कार्यक्रमाची टीआरपी फार कमी झाली होती. मात्र आता पुन्हा कपिलला दिलासा मिळाला आहे. याचे कारण म्हणजे या कार्यक्रमाने पुन्हा एकदा टॉप ५ मध्ये आपली जागा बनवली आहे.

अभिनेता कीकू शारदाने ट्विट करून याची माहिती दिली. या ट्विटमध्ये कीकूने टीआरपी रेटींगचा तक्तासुद्धा जोडला आहे ज्यामध्ये ‘द कपिल शर्मा शो’ पाचव्या क्रमांकावर दिसत आहे. ‘देशातील हिंदी कार्यक्रमांमध्ये पहिल्या पाच क्रमांकांमध्ये परतलो. मित्रांचे धन्यवाद, आम्हाला लोकांचे मनोरंजन करणे आवडते आणि यापुढेही आम्ही ते करत राहू,’ अशा शब्दांत कीकूने चाहत्यांचे आभार मानले.

वाचा : VIDEO : बघा प्रागमध्ये सुनील ग्रोवर हे काय करतोय…

कीकू या कार्यक्रमात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारत लोकांचे मनोरंजन करत आला आहे. सुनील ग्रोवर हा कार्यक्रम सोडण्याआधी चाहत्यांनी त्याच्या रिंकू भाभी आणि मशहूर गुलाटीच्या भूमिका खूप पसंत केल्या होत्या. आजही लोक कार्यक्रमामध्ये सुनीलची आठवण काढतात. दरम्यान ४ जून रोजी कपिल आजारी असल्याने हा कार्यक्रम प्रदर्शित होऊ शकला नाही. मात्र या बातमीने कपिलचे स्वास्थ नक्कीच बरे होईल अशी आशा आहे. सोनी वाहिनीने या कार्यक्रमाला याआधी टीआरपी कमी झाल्याने नोटीस बजावली होती त्यामुळे टॉप ५ मध्ये जागा मिळवल्यानंतर त्यांनाही दिलासा मिळेल अशी आशा आहे.