गेल्या काही दिवसांपासून युट्यूब, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सर्वाधिक चर्चा पाहायला मिळतेय ती प्रिया प्रकाश वरियरची. या मल्याळम अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटातील गाण्याचा टीझर वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. तिच्या चेहऱ्यावरील हावभावांनी तरुणाईला वेड लावलं. त्याचबरोबर तिच्या ‘उरू अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) हे गाणंही प्रकाशझोतात आलं. पी एम ए जब्बार यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेच्या माप्पिला या गाण्याचं नवीन स्टायलिश व्हर्जन आहे. मोहम्मद पैगंबर यांची पहिली पत्नी खदीजा बिंत ख्वालिद यांच्या स्वभावगुणांचं वर्णन या गाण्यात केलं आहे.

मूळ गाणंसुद्धा प्रसिद्ध झालं होतं आणि त्याचे काही व्हर्जन युट्यूबवरही पाहायला मिळतील. माप्पिला पाट्टू हा एक पारंपरिक मुस्लीम गाण्याचा प्रकार असून केरळातील लग्नसमारंभात किंवा शाळा-कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गायलं जातं. प्रियामुळे पुन्हा एकदा हे गाणं चर्चेत आलं आणि त्याच्या गीतकाराचा शोध सुरू झाला. ieMalayalam.com ने अखेर जब्बार यांना शोधून काढलं. सध्या ते सौदी अरेबियातील एका जनरल स्टोअरमध्ये काम करत आहेत. त्यांनी ४ दशकांपूर्वी हे गाणं लिहिलं होतं आणि तेव्हा ते फक्त २० वर्षांचे होते. मूळ थ्रिसूर जिल्ह्याचे जब्बार यांनी ५०० हून अधिक गाणी लिहिली आहेत आणि गेल्या पाच वर्षांपासून ते रियाधमध्ये एका जनरल स्टोअरमध्ये काम करत आहेत.

‘उरू अदार लव्ह’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही महिन्यांपूर्वी या गाण्याच्या नवीन व्हर्जनवर काम करण्यास सुरूवात केली होती. विनीत श्रीनिवासन यांच्या आवाजातील हे नवीन व्हर्जन उस्ताद जब्बार यांनाही भावलंय. त्याचप्रमाणे या गाण्यावरून सुरू असलेला वाद निरर्थक असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.