केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची धग इतकी वाढलीये की आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे पंजाबी कलाकार, हॉलिवूडचे कलाकार शेतकऱ्यांचं समर्थन करत आहेत. तर, बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी मात्र अजूनही यावर मौन बाळगलंय. यावरुनच आपल्या रोखठोक मतांसाठी ओळखले जाणारे बॉलिवुडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडच्या कलाकारांना खडेबोल सुनावलेत. शाह यांचा मुलाखतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ते शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत.
या व्हिडिओत शेतकरी आंदोलनावरुन मौन बाळगणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना खडेबोल सुनावताना नसीरुद्दीन शाह दिसत आहेत. “आपल्या फिल्म इंडस्ट्रीतले अनेक मोठमोठे धुरंदर लोकं शांत बसलेत. कारण, त्यांना खूप काहीतरी गमावण्याची भीती वाटतेय. अरे भाई… जर तुम्ही इतकं कमवून ठेवलंय की तुमच्या सात पिढ्या घरी बसून खाऊ शकतील, तर किती गमवाल?” असा सवाल शाह यांनी विचारलाय. तसंच, “शांत राहणं अन्याय करणाऱ्यांना समर्थन देण्याइतकाच मोठा गुन्हा आहे”, असंही नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलंय.
Ah hunda mard #FarmersProtest https://t.co/BPwSZumCwG
— Jazzy B (@jazzyb) February 5, 2021
पंजाबचा प्रसिद्ध सिंगर जॅझी बी(Jazzy B) याने हा व्हिडिओ शेअर केला असून त्यासोबत हाच खरा मर्द असं कॅप्शन वापरलं आहे. नसीरुद्दीन शहा यांचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.