बॉलिवूडचा ‘सुलतान’ अर्थात सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर जिंदा है’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल सलमानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. कारण पुन्हा एकदा ‘दबंग’ खान त्याच्या अॅक्शन अवतारमध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ या खास पाच कारणांसाठी तुम्ही पाहू शकता..
१. सर्वांत पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे, सलमान खान. चित्रपटाचा विषय कोणताही असला तरी ‘भाईजान’ला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता असतेच. ‘ट्युबलाइट’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकला नव्हता. त्यामुळे या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
२. ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा हा सिक्वल असल्याने कथेच्या गरजेनुसार यात साहसदृश्यं भरभरून आहेत. टॉम स्ट्रथर्स या हॉलिवूड अॅक्शन कोरिओग्राफरने यातील साहसदृश्यांसाठी काम केले आहे. ‘द डार्क नाईट’सारख्या चित्रपटांसाठी त्याने स्टंट कोरिओग्राफी केली आहे. त्यामुळे सलमानचा जबरदस्त अॅक्शन अवतार पाहायला मिळणार यात काही शंका नाही.
३. तिसरं कारण म्हणजे सलमान आणि कतरिनाची केमिस्ट्री. पाच वर्षांनंतर ही जोडी पडद्यावर एकत्र दिसत आहे. चित्रपटाच्या गाण्यांतून त्यांच्या रोमॅण्टिक केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळाली आणि त्याला प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे टायगर आणि झोया या भूमिका साकारणारे सलमान आणि कॅट तुम्हाला आकर्षित करतील असं म्हणायला हरकत नाही.
४. या चित्रपटाचे कथानक आणि अली अब्बास जफरचे दिग्दर्शन हे सुद्धा चित्रपट पाहण्यासाठी एक कारण ठरू शकते. सलमान आणि अली अब्बास जफरने यापूर्वी ‘सुलतान’ चित्रपटासाठी एकत्र काम केलं. हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर गाजला. त्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा कमाल करू शकेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
५. पाचवं कारण म्हणजे यातील गाणी. ‘स्वॅग से करेंगे सबका स्वागत’ आणि ‘दिल दिया गल्ला’ ही दोन गाणी प्रदर्शित झाल्यापासूनच चाहत्यांच्या प्ले लिस्टमध्ये दाखल झाली आहेत. अॅक्शनसोबतच रोमान्सचाही तडका यात पाहायला मिळणार आहे.