अभिनेता सलमान आज प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर जरी असला तरी एक काळ असा होता जेव्हा त्याच्याही करिअरमध्ये चढउतार आले. बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सलमानने खूप मेहनत घेतली, पण त्याचे काही चित्रपट प्रदर्शितच होऊ शकले नाहीत. जाणून घेऊयात, हे कोणते चित्रपट आहेत…

‘रण क्षेत्र’


‘मैने प्यार किया’ या चित्रपटानंतर सलमान आणि भाग्यश्री ही जोडी खूप प्रसिद्ध झाली. दोघांनाही चित्रपटांचे अनेक ऑफर्स मिळू लागले होते. त्यानंतर त्यांनी ‘रण क्षेत्र’ या चित्रपटाचा करार केला. मात्र भाग्यश्रीने लग्न केल्यामुळे त्याचं शूटिंग पूर्ण होऊ शकलं नाही. म्हणून हा चित्रपट प्रदर्शित झालाच नाही.

‘दिल है तुम्हारा’


सलमान खान, सनी देओल आणि मीनाक्षी शेषाद्री यांना घेऊन दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी ‘दिल है तुम्हारा’ या चित्रपटाचं शूटिंग सुरु केलं. दुर्दैवाने तिघांचा एकत्र एकच सीन शूट झाला आणि त्यानंतर राजकुमार संतोषी बॉबी देओलच्या ‘बरसात’ चित्रपटाचं काम पाहू लागले. ‘बरसात’चं दिग्दर्शन आधी शेखर कपूर करत होते. त्यामुळे सलमानची मुख्य भूमिका असलेला ‘दिल है तुम्हारा’ चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.

‘ऐ मेरे दोस्त’


या चित्रपटात अरबाज खान, दिव्या भारती, करिश्मा कपूर आणि सलमान खान यांच्या भूमिका होत्या. सुरुवातीला यातील एका गाण्याचं शूटिंग झालं. पण त्यानंतर काही कारणाने हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. नंतर शूट झालेलं गाणं सलमानच्या १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मजधार’ या चित्रपटात वापरण्यात आलं.

‘राम’


सलमानच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन त्याचा भाऊ सोहेल खान करत होता. जवळपास ५० टक्के शूटिंग पूर्णही झालं होतं. मात्र चित्रपट निर्मितीशी संबंधित काही समस्यांमुळे अर्ध्यावरच पॅकअप करावं लागलं. यामध्ये सलमानसोबत अनिल कपूर आणि पूजा भट्ट यांच्याही भूमिका होत्या.

‘दस’


या चित्रपटात सलमान, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि संजय दत्तची भूमिका होती. मात्र १९९७ मध्ये याचे दिग्दर्शक मुकुल एस. आनंद यांचं निधन झालं आणि चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यावरच थांबले.