‘कौन बनेगा करोडपती’चा यंदाचा सिझन मागील आठ सिझनपेक्षा सर्वांत जास्त यशस्वी ठरला. अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला हा शो पहिल्या भागापासूनच ‘टीआरपी’च्या यादीत अग्रस्थानी राहिला आहे. सलमानचा ‘बिग बॉस’ आणि अक्षय कुमारच्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमांनाही ‘केबीसी’ने मागे टाकलं आहे. ‘केबीसी’चा हा नववा सिझनसुद्धा लवकरच संपणार आहे. यावेळी काही अनोखे बदल करून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असतानाच ‘केबीसी’चा अंतिम आठवडासुद्धा हटके करण्याचा विचार निर्मात्यांनी केला आहे.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार काही रंजक बदल या अंतिम आठवड्यात करण्यात येणार आहेत. ‘व्हिडिओ ए फ्रेंड’ या पर्यायासाठी एक रोबोट कार्यक्रमात आणण्यात येणार आहे. ‘बिमी’ असं या रोबोटचं नाव असेल. त्याचप्रमाणे प्रसारणाच्या वेळेतही बदल करण्यात येणार आहे. अंतिम आठवडा असल्याने रात्री साडेआठ वाजता ‘केबीसी’चं प्रसारण होईल. काही विशेष पाहुण्यांनाही निमंत्रित केल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये अभिनेत्री विद्या बालन, क्रिकेटर युवराज सिंग आणि नोबेल पुरस्कार विजेते आणि सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांचा समावेश आहे.

वाचा : असा साजरा होणार तैमुरचा पहिला वाढदिवस; करिष्मा कपूरने दिली माहिती

नवीन बदलांसह प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘केबीसी’च्या या नवव्या सिझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. बिग बींसाठीसुद्धा हा सिझन तितकाच विशेष होता. हा सिझन संपत असताना बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमधून भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिलं की, ‘सिझनचा अंतिम आठवडा जवळ आल्याने या कार्यक्रमाशी जोडले गेलेले आम्ही सगळे दु:खी आहोत. या टीममधील वेगवेगळ्या विभागातील जवळपास ४५० लोक ‘केबीसी’ यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांशिवाय हे यश मिळणं शक्य झालं नसतं. संपूर्ण टीमला माझा सलाम आहे.’

Story img Loader