येत्या १५ ऑगस्ट रोजी काय आहे असा प्रश्न विचारल्यास तुम्हाला कदाचित मूर्खपणा वाटेल. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो असंही उत्तर तुम्ही द्याल. पण याच दिवशी आणखी एका गोष्टीची लोकांना प्रचंड उत्सुकता आहे ती म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनची. पहिल्या सिझनच्या कथेने प्रेक्षकांमध्ये इतकी उत्सुकता निर्माण केली आहे की आता दुसरा सिझन कधी एकदाचा प्रदर्शित होतोय असं त्यांना वाटू लागलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का, नेटफ्लिक्सवर हा दुसरा सिझन प्रदर्शित होण्यापूर्वी तुम्हाला एक दिवस आधीच म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी तो पाहता येणार आहे.

ज्यांच्याकडे वनप्लस स्मार्टफोन आहे, त्यांना एक दिवस आधीच सेक्रेड गेम्स २ पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सने यासंदर्भातली घोषणा केली आहे. इतकंच नव्हे तर वनप्लस कम्युनिटीच्या मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू याठिकाणी या बहुप्रतिक्षित वेब सीरिजची स्क्रिनिंग ठेवण्यात येणार आहे.

कसं पाहता येणार?
वनप्लस स्मार्टफोनवर ही सीरिज पाहण्यासाठी युजर्सना आधी नोंदणी करावी लागेल. नोंदणी केलेल्या युजर्सना दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत सेक्रेड गेम्स २ चा पहिला एपिसोड पाहता येईल. नेटफ्लिक्स दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून स्पेशल स्क्रिनिंगची तिकीटं विकली जातील.

स्पेशन स्क्रिनिंगची ठिकाणे-
मुंबई- पीव्हीआर फिनिक्स मॉल, लोअर परेल- संध्याकाळी सात वाजता
दिल्ली- पीव्हीआर इसीएक्स चाणक्य, चाणक्यपुरी- रात्री आठ वाजता
बेंगळुरू- पीव्हीआर फोरम मॉल, कोरमांगला- रात्री आठ वाजता