नाताळ सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे आणि सर्वत्र त्याच्या तयारीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ख्रिसमस कार्ड्स, भेटवस्तू या सर्वांची लगबग सुरू आहे. विशेष म्हणजे बच्चे कंपनीला भेटवस्तू देणाऱ्या सांताक्लॉजबद्दल बरीच उत्सुकता असते. उद्या नाताळ सण आहे आणि एक दिवस आधीच दिग्दर्शक करण जोहरच्या मुलांना सांताक्लॉजकडून भेटवस्तू मिळाल्या आहेत. यश आणि रुहीसाठी करणची जिवलग मैत्रीण आणि एक प्रसिद्ध अभिनेत्री सांताक्लॉज बनून आली आहे.
करण जोहरच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे त्याची मुलं. आपल्या लाडक्या मुलांविषयी म्हणजेच यश आणि रुहीच्या आयुष्याविषयी तो बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावरून चाहत्यांना सांगत असतो. यश- रुहीला सांताक्लॉजकडून मिळालेल्या भेटवस्तूंचे फोटो करणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केले आहेत. त्यांच्यासाठी सांताक्लॉज बनून येणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून चक्क राणी मुखर्जी आहे. बाहुल्या, फुगे, फुले, भेटवस्तू, खेळणी अशा भेटवस्तूंचा जणू वर्षावच राणीने यश- रुहीवर केला आहे.
वाचा : रफीसाहेबांच्या या ७ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
हे फोटो पोस्ट करत करणने लिहिले की, ‘जेव्हा माझ्या मुलांसाठी राणी सांताक्लॉज होते…’ करण आणि राणीची मैत्री किती घनिष्ठ आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. यश आणि रुहीचा हा पहिलाच ख्रिसमस राणीने अनोख्या अंदाजात साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे.
एकल पालकत्व स्वीकारणाऱ्या करणच्या आयुष्यात सरोगसीद्वारे यश आणि रुहीचं आगमन झालं होतं. ज्यावेळी त्याने आपण गोड मुलांचं पालकत्व स्वीकारल्याचं जाहीर केलं होतं त्यावेळी अनेकांनीच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.