बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागते. काही अभिनेत्रींनी तर या त्रासाला कंटाळून अभिनयाच्या करिअरला पूर्ण विराम लावला. यामधील एक अभिनेत्री म्हणजे किमी काटकर. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम’ या चित्रपटातील ‘चुम्मा.. चुम्मा दे दे’ या गाण्यामुळे किमी खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली होती. या चित्रपटानंतर तिने मोजक्याच चित्रपटात काम केले.

त्यावेळी किमी ही बॉलिवूडमधील एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. किमीचे बॉलिवूडमधील करिअर हे फार छोटे आहे. पण किमी ही तिच्या बिनधास्तपणामुळे देखील लोकप्रिय होती. मात्र आज या बोल्ड अभिनेत्रीला ओळखणे देखील कठीण झाले आहे. किमीने वयाच्या १७ व्या वर्षी ‘पत्थर दिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर तिने ‘टार्जन’ चित्रपटात काम केले. या चित्रपटात दिलेल्या बोल्ड सीनमुळे किमीच्या चर्चा रंगल्या होत्या.

किमीने ‘दरिया दिल’, ‘मेरा दिल’, ‘वर्दी’, ‘शेरदिल’, ‘जुल्म की हुकुमत’, ‘गेर कानूनी’ या चित्रपटांमध्ये काम केले. पण हम चित्रपटातील ‘चुम्मा… चुम्मा दे दे’ या गाण्यामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. दरम्यान सतत बोल्ड सीनच्या येणाऱ्या ऑफर किमीने नाकारण्यास सुरुवात केली होती. तिने यश चोप्रा यांच्या चित्रपटातही काम करण्यास नकार दिला. नंतर किमीने प्रसिद्ध फोटोग्राफर शांतनुशी लग्न करत बॉलिवूडला राम राम ठोकला आणि ती ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. किमी अनेक वर्षांनंतर पुन्हा मायदेशी परतली असून सध्या ती पती आणि मुलासोबत पुण्यात राहते.

भारतात परतल्यानंतर किमीने एक मुलाखत दिली असल्याचे म्हटले जात आहे. या मुलाखतीमध्ये तिने चित्रपटसृष्टीमध्ये होणाऱ्या शोषणामुळे बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. ‘मी या चित्रपटसृष्टीला कंटाळून दूर जाण्याचा निर्णय घेतला. इथे अभिनेत्री पेक्षा अभिनेत्याला जास्त महत्त्व दिले जाते आणि मला तेच सहन होत नाही’ असे किमी म्हणाली.