गेल्या २५ वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता शाहरुख खान प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘फौजी’, ‘सर्कस’मधील त्याच्या भूमिकांपासून ते अगदी सध्या चर्चा सुरु असणाऱ्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातील भूमिकेपर्यंत त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. पण, शाहरुखला अभिनयाची जाण नाही असं त्याला एका नवोदित अभिनेत्रीने सांगितलं होतं. बसला ना तुम्हालाही धक्का? हे खरंय. खुद्द शाहरुखनेच एका मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला.
आता तुम्हालाही हाच प्रश्न पडतोय ना, की शाहरुखच्या अभिनय कौशल्यावर प्रश्नचिन्ह नेमकं कोणी उपस्थित केलं? ती नवोदित अभिनेत्री होती, अनुष्का शर्मा. एका मुलाखती दरम्यान अनुष्काचे शाहरुखविषयीचे विचार सांगताना राजीव मसंद यांनी ‘ती तुला पहिल्यांदा पाहून भारावली होती,’ असं त्याला सांगितलं. त्यावेळी राजीवला मध्येच थांबवत शाहरुख म्हणाला, ती खोटं बोलतेय. मी हे आधीही बोललो आहे आणि आताही बोलतोय, की चित्रीकरणाच्या सुरुवातीलाच ती माझ्याजवळ येऊन म्हणाली होती, तुला अभिनय येत नाही.’ शाहरुखने ‘रब ने बनादी जोडी’ या चित्रपटाच्या वेळचा हा खुलासा केला तेव्हा खुद्द राजीवलाही धक्का बसला.
वाचा : गोष्ट पहिल्या सुपरस्टारच्या पहिल्या प्रेयसीची…
पुढे शाहरुख म्हणाला, तुम्ही हवं तर तिला विचारा. चित्रपटातील संवाद लक्षात ठेवण्यामध्ये तिची सवय अगदी माझ्याप्रमाणेच आहे. त्या बाबतीत मी तिचं कौतुक करतो. ‘रब ने बना दी जोडी’च्या वेळी मी आदित्यलाही यासंबंधी सांगितलं होतं. ती खरंच खूप चांगली अभिनेत्री आहे. यानंतर शाहरुख म्हणाला की, ‘ती म्हणालेली, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. मला तुम्ही फार आवडता. पण, एक अभिनेता म्हणून मला तुम्ही कधीच आवडला नाहीत.’ या चित्रपटाच्या शेवटच्या दृश्याच्या वेळी तिने मला मिठी मारली, असं सांगत शाहरुखने खरी आणि चुलबुली अनुष्का सर्वांसमोर आणली. त्या क्षणाविषयी सांगताना शाहरुख म्हणाला, ‘तिने मला मागूनच मिठी मारली. त्यावेळी मला वाटलं आतातरी हिला माझा अभिनय आवडला असेल. पण, तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात. असं ती म्हणाली.’ चित्रपटाच्या सुरुवातीला अनुष्काचं शाहरुखविषयी जे मत होतं तेच अगदी त्या चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यापर्यंत ठाम राहिली. याचंच शाहरुखला फार कौतुक होतं, हे त्याने स्पष्ट केलं. किंग खान आणि अनुष्का शर्मा ही जोडी ऑनस्क्रीनसुद्धा बरीच गाजली. आतापर्यंत ‘रब ने बनादी जोडी’ आणि ‘जब तक है जान’ या चित्रपटांतून त्यांनी स्क्रीन शेअर केलीये. अशी ही जोडी लवकरच ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या गाण्यांना बरीच पसंती मिळत आहे.