दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या ट्रेलरने सर्वांनाच मंत्रमुग्ध होण्यास भाग पाडले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अनेकांना आता या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली असतानाच दीपिकाचा पूर्वाश्रमीचा प्रियकरसुद्धा ‘पद्मावती’ पाहण्यासाठी आतूर झाला आहे. अभिनेता रणबीर कपूरने स्वत:च ही भावना व्यक्त केली आहे.

या चित्रपटात दीपिका पदुकोण राणी पद्मावती, शाहिद कपूर राजा रावल रतन सिंह तर रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये या तिघांच्या भूमिकेची झलक पाहायला मिळाली आणि सर्वांनीच त्यांच्या अभिनयाची प्रशंसा केली. रणबीरलाही हा ट्रेलर पाहून आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यामध्ये दीपिकाची भूमिका पाहून त्याच्या अंगावर काटा आला.

वाचा : …अन् चिडलेल्या अनुरागने चाहत्याला सुनावले

एका नामांकित वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने म्हटले की, ‘एकीकडे तुम्हाला दु:खही होतं तर दुसरीकडे तुम्ही प्रोत्साहितदेखील होता. माझ्या करिअरमधील हे दहावं वर्ष आहे. सुरुवातीला मी स्पर्धात्मक आणि ईर्ष्येच्या दृष्टिकोनातून विचार करत होते. मात्र एक वेळ अशी येते की तुम्ही तुमच्या अस्तित्वाचा, तुमच्या आवडीचा आणि तुम्ही किती चांगले आहात याचा विचार करू लागता. वरूण धवनचा ‘जुडवा २’ हा चित्रपट पाहून मला आनंद झाला की, फार कमी वेळात तो प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाला. ‘पद्मावती’मधील दीपिका, शाहिद आणि रणवीरचा लूक पाहिल्यानंतर मी तो चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे.’ रणबीरकडून ही प्रशंसा ऐकून दीपिकाला नक्कीच आनंद होईल. ब्रेकअपनंतरही दोघांनी ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘तमाशा’ या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होत.