येत्या ९ सप्टेंबरला अभिनेता अक्षय कुमार त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करणार आहे. सलमान, आमिर आणि शाहरुख हे बॉलिवूडचे तिनही खान त्यांच्या वाढदिवसाला कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसाठी पार्टीचं आयोजन करतात. मात्र अक्षयचा त्याच्या वाढदिवसाला थोडा वेगळाच बेत आहे. आपल्या कुटुंबासोबत स्वित्झर्लँडला जाण्याचा त्याचा विचार आहे. अक्षय वाढदिवसाच्या वीकेंडला चार दिवस स्वित्झर्लँड ट्रिपला जाणार असल्याचं ‘मुंबई मिरर’ या वृत्तपत्रात म्हटले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी वाढदिवस असल्याने त्या वीकेंडला अक्षय स्वित्झर्लँडमध्ये असेल. तिथे जाण्याचं विशेष कारण म्हणजे त्याची मुलगी निताराने बर्फ पडताना बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे. व्यग्र कामकाजातूनही आपल्या मुलांना वेळ देण्याला अक्षय नेहमीच प्राधान्य देतो. निताराने तिची इच्छा व्यक्त केल्यानंतर अक्षयने वाढदिवसाच्या निमित्ताने स्वित्झर्लँडला जाण्याचा निर्णय घेतला. या परदेश यात्रेपूर्वी खिलाडी कुमारच्या मुंबईच्या घरी एक पूजा असणार आहे. यावेळी आई अरुणा भाटिया, बहिण अल्का, सासू डिंपल कपाडिया आणि मेहुणी रिंकल खन्ना-सरन यांच्यासोबतही वेळ घालवण्यास त्याला मिळणार आहे.

वाचा : हृतिकला माझी माफी मागावीच लागेल- कंगना रणौत

दरम्यान अक्षयच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, ११ ऑगस्ट रोजी त्याचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तो यशस्वी ठरला. पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये त्याला ‘२.०’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तो रजनीकांत आणि अॅमी जॅक्सनसोबत भूमिका साकारणार आहे. याशिवाय त्याचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपटसुद्धा पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.