‘पद्मावत’ चित्रपटाच्या समोर उभ्या असणाऱ्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नव्हत्या. करणी सेना आणि इतर राजूपत संघटनांकडून चित्रपटाला होणारा विरोध, मेवाडच्या राजघराण्याकडून चित्रपटावर असणारी नाराजी यासोबतच ‘पद्मावत’पुढे आणखी एक आव्हान होतं ते म्हणजे अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचं. पण, ‘पद्मावत’साठी खुद्द खिलाडी कुमारने एक महत्त्वाचा निर्णय घेत या चित्रपटाच्या वाटेतील एक अडथळा दूर केला.
‘पद्मावत’ चित्रपटाचं प्रदर्शन सुरळीत व्हावं यासाठी अक्षयने त्याचा बहुचर्चित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट ‘पद्मावत’नंतर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. भन्साळींच्या बिग बजेट चित्रपटाचं महत्त्व आणि त्यांनी आतापर्यंत सामना केलेल्या अडचणींचा आढावा घेत अक्षयने आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली. मोठ्या मनाने अक्षयने हा निर्णय घेतला आणि त्याला पाहून भन्साळीही भारावले. अक्षयने मनापासून शुभेच्छा देत त्याने एक प्रकारे ‘पद्मावत’च्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या याच उपकारांची परतफेड आता भन्साळी एका वेगळ्या मार्गाने करणार आहेत.
वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भन्साळी येत्या काळात अक्षयसोबत एका चित्रपटावर काम करणार असून त्याच्या उपकारांची परतफेड करणार आहेत. खिलाडी कुमार आणि भन्साळी हे दोघंही एकत्र येऊन नेमके कोणत्या प्रोजेक्टवर काम करणार याविषयी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, जर हे वृत्त खरं असेल तर भन्साळींनी उपकारांची जाण ठेवत त्याची परतफेड करण्यासाठी लढवलेली ही शक्कल मात्र प्रशंसनीय असून, प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी ठरणार आहे हे नक्की. दरम्यान, ९ फेब्रुवारीला अखेर ‘पॅडमॅन’च्या रुपात अक्षय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्याच्या घडीला या चित्रपटाकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.