विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अनेकांना ‘कपल गोल्स’ दिले आहेत. त्याचसोबत या दोघांच्या चाहत्यांना फॅशनच्या नवनव्या कल्पनाही नक्कीच मिळाल्या असतील. टस्कनीमध्ये झालेल्या त्यांच्या लग्नात विरुष्काने प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केलेले कपडे घातले होते. तेव्हापासून त्यांचे कपडे, ज्वेलरी या सगळ्याचीच चर्चा होत आहे. काल दिल्लीत त्यांचे वेडिंग रिसेप्शन पार पाडले. यावेळीही या दोघांच्या लूकमागे सब्यासाचीचाच हात होता.
पाहा, विराट-अनुष्काला पंतप्रधानांनी काय गिफ्ट दिले
विरुष्काने काल झालेल्या रिसेप्शनमध्ये त्यांचा शाही अंदाज दाखवला. लाल रंग हा प्रत्येक नवविवाहितेसाठी फार महत्त्वाचा असतो. त्यामुळेच अनुष्काने लाल आणि सोनेरी रंगाची सब्यासाचीने डिझाइन केलेली साडी नेसली होती. वजनदार आणि जडाऊ दागिने, केसात मोगऱ्याचा गजरा, भांगेत कुंकू यामुळे अनुष्काच्या सौंदर्यात अधिकच भर पडली होती. विराटने काळ्या रंगाची अचकन, पांढरा चुडीदार आणि त्यावर नक्षीकाम केलेली शाल घेतली होती. या रिसेप्शनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनुष्काने घातलेल्या वजनदार दागिन्यांनी सर्वाधिक चर्चा होत आहे.
VIDEO : रिसेप्शनमध्ये शाहिदच्या गाण्यावर थिरकले विरुष्का
अनुष्काने रिसेप्शनसाठी हेरिटेज अनकट गोल्ड आणि डायमंड चोकर – झुमके घालण्यास प्राधान्य दिले होते. त्यात तिने नेसलेली लाल रंगाची बनारसी साडी तर अधिकच खुलून दिसत होती. सब्यासाचीचे ग्राहक असलेल्या एका व्यक्तीने ‘हेरिटेज ब्रायडल कलेक्शन’मधील या ज्वेलरीच्या किंमतीचा खुलासा केला. या सुंदर चोकर आणि झुमक्यांची किंमत अंदाजे २५ ते ३० लाखांच्या घरात आहे.
येत्या २६ डिसेंबरला विराट-अनुष्काने मुंबईत आणखी एक रिसेप्शन ठेवले आहे. या रिसेप्शनला बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहतील. यानंतर हे दोघं द.आफ्रिकेला रवाना होतील आणि तेथेच नवीन वर्षाचा आनंदही साजरा करतील. यानंतर अनुष्का भारतात परतणार असून ती वरुण धवनसोबत आगामी ‘सुई धागा : मेड इन इंडिया’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल.