त्याच्या चित्रपटांची निवड योग्य नाही किंवा तो अभिनय क्षेत्रात वडिलांइतका यशस्वी ठरू शकत नाही, अशी वक्तव्यं अभिनेता अभिषेक बच्चनसाठी नेहमीच ऐकायला मिळाली. ठराविक चित्रपट सोडता करिअरमध्ये त्याने विशेष कामगिरी केली नाही आणि आता दोन वर्षांनंतर तो ‘मनमर्जियां’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाने अभिषेकच्या करिअरची गाडी पुन्हा वेग घेईल, असं मानलं जात आहे. कारण ‘मनमर्जियां’नंतर त्याच्याकडे आणखी तीन चित्रपट आहेत.

२०१६ मध्ये ‘हाऊसफुल ३’ या चित्रपटात अभिषेक अखेरचा दिसला होता. त्यापूर्वी ‘ऑल इज वेल’ आणि ‘हॅपी न्यू इयर’सारख्या चित्रपटांतही त्याने भूमिका साकारली. पण हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटले. आता ‘मनमर्जियां’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा आहेत. यामध्ये अभिषेकसोबतच तापसी पन्नू आणि विकी कौशलसुद्धा झळकणार आहेत.

‘डिएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार, ‘मनमर्जियां’नंतर अभिषेक अनुराग बासूच्या एका चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अनीस बाज्मीच्या ‘पागलपंती’ या चित्रपटाबद्दलही त्याची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्याचसोबत ‘गुलाबजामून’ या चित्रपटात तो पत्नी ऐश्वर्या राय बच्चनसोबत भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

वाचा : शेक्सपिअरच्या या गाजलेल्या कादंबरीवर आधारित चित्रपटात प्रियांका चोप्रा

याआधी वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या तुलनांवर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला होता, ‘माझी अनेक वेळा माझ्या वडीलांबरोबर अर्थात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तुलना केली जाते. त्यांचे चित्रपट सुपरहिट ठरतात. तर माझे चित्रपट सरासरी कमाई करतात. त्यामुळे अनेक वेळा मला ट्रोलही करण्यात येतं. मात्र माझ्याविषयी होणाऱ्या या चर्चांना किंवा तुलनेला मी तुलना समजत नाही. प्रत्येक व्यक्तीचा हा दृष्टीकोन असतो. त्यामुळे ते त्यांच्या दृष्टीने विचार करुन ट्रोल करत असतात. मात्र एक नक्की अमिताभजी माझे वडील आहेत. त्यामुळे त्यांच्यातील काही गुणही माझ्यात आहेत.’

अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल यांचा ‘मनमर्जियां’ हा चित्रपट येत्या १४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.