बॉलिवूडचा खलनायक ‘क्राइम मास्टर गोगो’ म्हणजेच अभिनेते शक्ती कपूर यांनी आजवर बऱ्याच दमदार भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमुळेच त्यांना ‘बॅड बॉय’ हे नाव मिळालं. चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेला एक वेगळी उंची गाठून दिल्यानंतर शक्ती कपूर यांनी विनोदी कलाकाराच्याही भूमिका अत्यंक खुबीने वठविल्या. पण बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक त्यांना एका अपघातामुळे मिळाला. हा रंजक किस्सा खुद्द शक्ती कपूर यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितला.

‘सिनेसृष्टीत यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे प्रतिभा तर असावीच लागते पण त्याचसोबत नशिबाची साथ असणे आवश्यक आहे. केवळ प्रतिभा असेल आणि नशिबाची साथ नसेल, तर तुम्ही या उद्योगात टिकू शकत नाही,’ असं म्हणत शक्ती कपूर यांनी अपघाताचा किस्सा सांगितला. ‘लिंकिंग रोडवरून दक्षिण मुंबईकडे जात असताना माझ्या गाडीची एका मर्सिडिजशी टक्कर झाली. जेव्हा मी गाडीतून उतरलो तेव्हा सहा फूट उंच देखणा माणून मर्जिडिजमधून बाहेर पडताना दिसला. तो फिरोज खान होता. त्यांना गाडीतून बाहेर येताना पाहून मी लगेच म्हणालो, सर माझं नाव शक्ती कपूर, मी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा केला आहे. कृपया मला तुमच्या चित्रपटात भूमिका द्या. पण त्यावेळी ते फक्त ऐकून पुन्हा गाडीत बसले आणि निघून गेले. त्यादिवशी संध्याकाळी मी के. के. शुक्ल या माझ्या जीवलग मित्राच्या घरी गेलो होतो. त्यावेळी तो फिरोज खानच्या ‘कुर्बानी’ चित्रपटासाठी लेखनाचं काम करत होता. मी गेलो तेव्हा त्याने मला सांगितले की फिरोज खान चित्रपटातील एका विशिष्ट भूमिकेसाठी, पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधील एका माणसाच्या शोधात आहे, जो त्यांच्या गाडीला धडकला होता. हे ऐकून मी उत्साहात ओरडलोच की मीच आहे तो माणूस,’ अशा प्रकारे शक्ती कपूर यांनी ‘कुर्बानी’ चित्रपटात पहिली मुख्य भूमिका मिळाली.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये शक्ती कपूर यांनी पद्मिनी कोल्हापुरेसह हजेरी लावली. यावेळी त्यांनी करिअरमधल्या बऱ्याच रंजक गोष्टी सांगितल्या.