ट्रॅफिकमुळे पुरस्कार सोहळ्याला पोहोचायला उशीर झाल्याने माझा पुरस्कार दुसऱ्याच अभिनेत्रीला देण्यात आला, असा गौप्यस्फोट अभिनेत्री कंगना रणौतने केला. चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा आणि राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत कंगनाने विविध पुरस्कार सोहळ्यांमधील तिचे अनुभव सांगितले. त्यासोबतच पुरस्कार सोहळ्यांना न जाण्याचा निर्णय तिने का घेतला हे सुद्धा तिने स्पष्ट केले.
‘एका पुरस्कार सोहळ्यासाठी मी तयार झाले होते. मला आता तो पुरस्कार कोणता होता हे आठवत नाही पण ‘लाइफ इन अ मेट्रो’ या चित्रपटासाठी मला पुरस्कार मिळणार होता. मी ट्रॅफिकमध्ये अडकले होते आणि उशिर झाल्याने मला सतत फोन येत होते. अखेर मी उशिरा पोहोचल्याने माझा पुरस्कार अभिनेत्री सोहा अली खानला ‘रंग दे बसंती’ या चित्रपटासाठी देण्यात आला,’ असे कंगना म्हणाली. अवघे दहा ते पंधरा मिनिटे उशीर झाल्याने दुसऱ्या अभिनेत्रीला तो पुरस्कार देण्यात आल्याचे तिने सांगितले.

हा एकच अनुभव नाही तर ‘क्रिश ३’ चित्रपटावेळीसुद्धा तिला आलेल्या अनुभवामुळे कंगनाने पुरस्कार सोहळ्यांना हजेरी न लावण्याचा निर्णय घेतला. २०१४ मधील तो प्रसंगदेखील तिने या मुलाखतीत सांगितला. कंगना म्हणाली की, ‘२०१४ मध्ये मी पटकथालेखनाच्या कोर्ससाठी अमेरिकेत होते. त्यावेळी मला फिल्मफेअरकडून फोन आला होता. ‘क्रिश ३’ या चित्रपटासाठी तुला पुरस्कार मिळणार आहे, त्यामुळे तू फक्त एका दिवसासाठी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लाव असे मला सांगण्यात आले. पण फक्त पुरस्कार घ्यायला जाण्यासाठी मला एका दिवसाचा १० लाखांचा खर्च येणार होता आणि माझा कोर्ससुद्धा अपूर्ण राहिला असता, म्हणून मी नकार दिलेला. त्यावेळी त्यांनी माझ्या जागी सुप्रिया पाठक यांना ‘रामलीला’ चित्रपटासाठी पुरस्कार दिला.’

वाचा : ‘क्वीन 2’च्या कथेविषयी राजकुमार म्हणतो…

कंगनाच्या या मुलाखतीनंतर फिल्मफेअरच्या एका अधिकाऱ्याने हे सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले. त्या पुरस्कारासंदर्भात कंगनाशी बोलणंच झालं नव्हतं असं त्या अधिकाऱ्याने ट्विटरवर स्पष्ट केले.