आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. त्यात विविध भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांची दाद मिळाली. ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटात काम करण्याचा अनुभवच वेगळा होता. हिंदी चित्रपटसृष्टी ही सासर असल्यासारखं वाटतं तर मराठी चित्रपटसृष्टी माहेर असल्याची भावना सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षितने व्यक्त केली. पुण्यात तिच्या आगामी ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत ती बोलत होती.

या पत्रकार परिषदेला माधुरीसोबतच ‘बकेट लिस्ट’मधला सहकलाकार सुमीत राघवन, चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस विजय देवस्करही उपस्थित होती. आता मराठी चित्रपटानंतर रंगभूमीवर काम करणार का असा प्रश्न यावेळी बॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’ला विचारला असता तिने नकार दिला. ‘मला व्यासपीठाची भीती वाटते. त्यामुळे रंगभूमीवर काम करण्याचा विचार नाही. चित्रपटांमध्ये रिटेक घेता येतात पण रंगभूमीवर तसं नसतं,’ असं ती म्हणाली.

वाचा : आमिरच्या ‘महाभारत’ चित्रपटात सलमान साकारणार ‘ही’ भूमिका?

‘बकेट लिस्ट’ चित्रपटाविषयी सांगताना ती पुढे म्हणाली की, ‘मराठी चित्रपटात भूमिका साकारणं हे माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं. आता या चित्रपटामुळे ही एक टास्क माझ्या लिस्टमधून कमी झाली आहे. मराठी चित्रपटात काम करण्याचा अनुभव सुखद होता आणि अगदी घरी असल्यासारखं वाटत होतं. मला आपल्या संस्कृतीशी जुळल्यासारखं वाटलं.’