बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. यासाठी ती गेल्या काही दिवसांपासून सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षणही घेत आहे. मात्र, यादरम्यान श्रद्धाला एक लहानशी दुखापत झाल्यामुळे तिला हे ट्रेनिंग सेशन काही काळासाठी थांबवाव लागणार आहे.

इन्स्टास्टोरीमध्ये फोटो पोस्ट करत श्रद्धाने याबद्दलची माहिती तिच्या चाहत्यांना दिली. यातील एका फोटोमध्ये तिच्या पायाला पट्टी बांधलेली पाहायला मिळत आहे तर एक्स-रेचाही फोटो तिने इन्स्टास्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. ‘फ्रॅक्चर नसून पाय मुरगळला आहे. काही दिवस आराम केल्याने बरा होईल,’ असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. पुढील काही दिवस बॉलिवूडची ‘हसीना’ जिम आणि बॅडमिंटन कोर्टवर जाणार नसून घरीच आराम करणार आहे.

वाचा : आमिर- अजयचं ‘सिक्रेट गोलमाल’!

याशिवाय आणखी एका कारणासाठी श्रद्धा रविवारी दिवसभर चर्चेत होती. यामागचं कारण होतं तिने केलेलं ट्विट. दिवाळीच्या शुभेच्छा देत असतानाच फटाक्यांचा वाढता वापर आणि प्रदूषणाची पातळी या साऱ्याचा प्राण्यांनाही फार त्रास होतो, हा महत्त्वाचा मुद्दा उचलत तिने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. नेटकऱ्यांनी मात्र तिच्या या विनंतीवर वेगळ्याच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आणि तिला ट्रोल केलं.