दाक्षिणात्य चित्रपटांनंतर बॉलिवूडची वाट धरणारा प्रत्येक कलाकार यशस्वी ठरतोच असं नाही. किंबहुना अनेकांना एक-दोन चित्रपटांनंतर बॉलिवूडमधून काढता पाय घ्यावा लागतो. पण आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री तापसी पन्नूने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जेवढी प्रसिद्धी मिळवली त्याहीपेक्षा अधिक बॉलिवूडमध्ये संपादित केली. बॉलिवूडच्या दमदार अभिनेत्रींच्या यादीत आज तापसीच नाव आवर्जून घेतलं जातं. आश्चर्याची बाब म्हणजे, अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तापसीने ‘इन्फोसिस’ या प्रतिष्ठित कंपनीमधील नोकरीची संधी नाकारली. खुद्द तापसीने याबाबत ‘कौन बनेग करोडपती’ या रिअॅलिटी शोमध्ये खुलासा केला.

इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या तापसीने कॉलेजमध्ये असताना तिच्या दोन मित्रमैत्रिणींसोबत मिळून एक अॅपसुद्धा विकसित केला होता. पण कॉलेजनंतर तापसीने या क्षेत्रात काम केलं नाही. तापसीला कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यूदरम्यान ‘इन्स्फोसिस’ कंपनीत नोकरीची संधी मिळाली होती. पण त्याचवेळी तिला काही मॉडेलिंगचे प्रोजेक्ट्सही मिळाले होते. अभिनयात करिअर करण्यासाठी तापसीने ‘इन्फोसिस’मधील मोठ्या पगाराची नोकरीची संधी नाकारली होती. याबाबत तापसीने ट्विटरवरही खुलासा केला होता.

दमदार अभिनयासोबतच तापसी तिच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावर किंवा मुलाखतींमध्येही तापसीचा हजरजबाबी स्वभाव अधोरेखित होतो. ‘पिंक’, ‘बदला’, ‘मिशन मंगल’, ‘मनमर्जियाँ’ या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader