बॉलिवूडची ‘बेबो’ करिना कपूर खान आणि ‘नवाब’ सैफ अली खान हे लग्नानंतरही बऱ्यापैकी रुपेरी पडद्यावर झळकत आहेत. या दोघांनी २०१२ मध्ये लग्न केल्यानंतर चित्रपटांमध्ये आपल्या सहकलाकारांसोबत चुंबन दृश्य न देण्याचा निर्धार केला होता. इतकेच नव्हे तर, चित्रपटासाठी करार करण्यापूर्वी त्यात चुंबन दृश्य असणार नाही याची ते पूर्ण खात्री करून घेत होते. पण, ‘की अॅण्ड का’ चित्रपटात करिनाने अर्जुन कपूरला तर ‘रंगून’मध्ये सैफने कंगना रणौतला किस केल्याचे पाहायला मिळाले. मग, असं काय घडलं ज्यामुळे त्यांचा ‘नो किसिंग क्लॉज’ मोडण्याची वेळ या दोघांवर आली. नुकतेच या प्रश्नाचे उत्तर खुद्द करिनानेच दिले.

सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान हिच्यामुळेच त्यांनी नो किसिंग क्लॉज तोडल्याचे कळते. फिल्मफेअरच्या सेलिब्रिटी चॅट शो दरम्यान करिनाने याबद्दल सांगितले. ‘बॉलिवूड चित्रपटांमधील इतर दृश्यांप्रमाणेच चुंबन दृश्य असतात. त्यामुळे त्यात काही गैर नाही,’ असं साराचं म्हणणं आहे. ‘फेमसली फिल्मफेअर’ हा रिअॅलिटी चॅट शो दर रविवारी रात्री ९ वाजता पाहता येणार असून, करिना यातील पहिली पाहुणी असणार आहे.

सारा अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्याही सध्या चर्चा आहेत. दिग्दर्शक, निर्माता करण जोहर याच्या ‘स्टुडण्ट ऑफ द इयर २’ या चित्रपटाने सारा तिच्या कारकिर्दीला सुरुवात करण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटातील हिरोसाठी अभिनेता टायगर श्रॉफची अधिकृत निवड झालेली आहे. पहिल्या ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’मधून आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन या तिघांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. आज हे तिघेही बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध कलाकार म्हणून नावारुपास आले आहेत.