नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. दिग्दर्शक ओम राऊतने अत्यंत भव्यदिव्य पद्धतीने हा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वीसुद्धा ठरला आहे. वीएफएक्सचा भरणा असलेल्या या चित्रपटाच्या प्रत्येक दृश्याची फार बारकाईने तयारी करण्यात आली. जवळपास तीन वर्षांपासून चित्रपटाची टीम यावर काम करत होती. ‘तान्हाजी’च्या पडद्यामागील दृश्ये दाखवणारा एक व्हिडीओ अजय देवगणने सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये चित्रपटाची एकंदर तयारी कशाप्रकारे करण्यात आली, त्याबद्दल ओम राऊत व बाकी टीम सांगताना दिसतेय.

चित्रपटात संधन दरीतील एक साहसदृश्य आहे. जवळपास ३०० फूट खोल ही दरी ओम राऊत यांना स्टुडिओत हुबेहूब दाखवायची होती. सेटवर ही दरी साकारणं सर्वांत अवघड काम होतं असं ते म्हणतात. याबद्दल ओम राऊत म्हणाले, “३०० फूट खोल दरी जशीच्या तशी स्टुडिओत साकारायची होती. प्रॉडक्शन डिझाइन श्रीराम अय्यंगर आणि सुजीत सावंत यांनी त्या दरीतील काही खडक आणले आणि त्या आकारची भिंत स्टुडिओत बांधली. त्यानंतर वीएफएक्सच्या मदतीने त्या भिंतीला दरीचं रुप देण्यात आलं.”

इतिहास भव्यदिव्य स्वरुपात साकारण्यासाठी ‘तान्हाजी’ची संपूर्ण गेल्या काही वर्षांपासून काम करत होती. चित्रपटासाठी साहसदृश्यांसाठी परदेशातून अॅक्शन डायरेक्टर बोलावण्यात आले होते. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून दहा दिवसांत चित्रपटाने कमाईचा १५० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. येत्या काही दिवसांत चित्रपट २०० कोटींचाही टप्पा पार करेल अशी शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक व्यक्त करत आहेत.