नवीन वर्षात कोणकोणत्या कलाकारांचे कोणते चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता अनेकांना असते. स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०१९ रोजी तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या तीन चित्रपटांच्या निमित्ताने प्रभास, अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम मोठ्या पडद्यावर एकमेकांसमोर भिडणार आहेत. एकाच दिवशी प्रभासचा बहुचर्चित ‘साहो’, अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ आणि जॉनचा ‘बाटला हाऊस’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये निर्माते भूषण कुमार यांचे दोन चित्रपट आहेत. ‘बाटला हाऊस’ आणि ‘साहो’ या दोन्ही चित्रपटांची निर्मिती भूषण कुमार करत आहेत.

प्रसिद्ध अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ चित्रपटाची त्याचे जगभरातील चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. एस. एस. राजामौलीच्या ‘बाहुबली’ सीरिजमधील दमदार अभिनयामुळे या हरहुन्नरी अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचे चाहते केवळ भारतातच नाहीत तर जगभरात आहेत. ‘बाहुबली’साठी तब्बल चार वर्षे प्रभासने दुसरा कोणताच चित्रपट स्वीकारला नव्हता. पण, या भव्य चित्रपटाचे काम पूर्ण होताच त्याने पुढच्या चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली. प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा यांची मुख्य भूमिका असलेला आगामी ‘साहो’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

अॅक्शन थ्रिलर असलेला ‘साहो’ हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रभास, श्रद्धासोबतच नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, महेश मांजरेकर आणि मंदिरा बेदी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘रन राजा रन’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजीत या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय.

प्रभासच्या वाढदिवशी ‘साहो’चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या अॅक्शन कोरिओग्राफीची धुरा केनी बेट्सने सांभाळली आहे. ‘ट्रान्सफॉर्मर्स’, ‘मिशन इम्पॉसिबल’, ‘रश अव्हर’ यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांतील अॅक्शनसाठी केनी प्रसिद्ध आहे. दुसरीकडे भारताच्या मंगळ मोहिमेवर भाष्य करणारा अक्षय कुमारचा चित्रपट ‘मंगल मिशन’ स्वातंत्र्यदिनीच प्रदर्शित होत आहे. यामध्ये विद्या बालन, तापसी पन्नू आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

प्रभास, अक्षयसोबतच जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. २००८ साली दिल्लीतील ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारलेला हा चित्रपट आहे.