साबीर खान दिग्दर्शिक ‘हिरोपंती’ हा चित्रपट २०१४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातून अभिनेता टायगर श्रॉफने कलाविश्वात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातील अॅक्शन सीनमुळे चर्चेत राहिलेला टायगर लवकरच या चित्रपटाच्या सीक्वलमध्येही झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. मात्र या पोस्टरची कल्पना एका हॉलिवूडपटाच्या पोस्टरवरुन घेतल्याची चर्चा आहे. केवळ चर्चाच नाही तर नेटकऱ्यांनी आरोपही केला आहे.
हॉलिवूडमध्ये लोकप्रिय ठरलेला ‘जॉन विक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अभिनेता कियानू रिव्ज यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातदेखील मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सीनचा भरणा करण्यात आला होता. याच चित्रपटाच्या पोस्टरवरुन ‘हिरोपंती 2’ चं पोस्टर तयार केल्याचं म्हटलं जातं आहे.
प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफने परिधान केलेले कपडे, त्याची उभं राहण्याची स्टाइल अगदी ‘जॉन विक’च्या पोस्टरमधील कियानू रिव्जप्रमाणे आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाची टॅगलाइनही ‘द वर्ल्ड वॉन्ट्स हिम डेड’ अशी आहे, जी ‘जॉन विक’च्या स्टोरीलाइनवरुन घेतली आहे. हॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट म्हणून ‘जॉन विक’कडे पाहिलं जातं.
वाचा : आला उन्हाळा..अशी घ्या काळजी!
दरम्यान, ‘हिरोपंती 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान करत असून निर्मिती साजिद नाडियादवाला करत आहेत. हा चित्रपट १६ जुलै २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.