बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या प्रेमप्रकरणाची सध्या बॉलीवूड वर्तुळात जोरदार चर्चा आहे. नुकतेच मुंबईत एका हॉटेलमध्ये डिनर डेटसाठी टायगर आणि त्याची कथित प्रेयसी दिशा पटानी एकत्र दिसले होते. पण टायगर हॉटेलमध्ये आल्याचे वृत्त समजताच त्याच्या चाहत्यांनी हॉटेलबाहेर गर्दी केली. त्यानंतर माध्यमांचे प्रतिनिधी देखील तेथे पोहोचले. दिशा पटानी ही टायगरच्या आधीच हॉटेलमध्ये पोहोचली होती. पण टायगर आपल्या कारमधून हॉटेलजवळ पोहोचला तेव्हा गर्दी पाहून बिथरला आणि त्याने कारमधून खाली उतरणे टाळले. हॉटेलमध्ये न जाताच दिशाला एकटं टाकून टायगरने पोबारा केला. काही वेळानंतर दिशा देखील हॉटेलमधून बाहेर आली आणि रिक्षातून निघून गेली. हॉटेलमधून बाहेर येतेवेळी तिच्या चेहऱयावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. टायगरने असं का केलं? याचं कारण काही कळू शकले नाही. याआधी देखील दोघं पॅरिसला जात असताना विमानतळावर पोहोचल्यानंतर टायगरने कारमधून बाहेर येणे टाळले होते. सुरुवातीला केवळ दिशाच विमानतळावर पोहोचली होती. त्यानंतर अर्ध्यातासाच्या अंतराने टायगर पुन्हा विमानतळावर दाखल झाला होता.