मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. यामध्ये मग सेलिब्रिटीसुद्धा अपवाद ठरत नाहीत. अभिनेता टायगर श्रॉफचं हे स्वप्न नुकतंच पूर्ण झालं आहे. ‘बागी २’ या चित्रपटानंतर टायगरची चांदी झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याने नुकतंच मुंबईत आठ बेडरुम्सचं आलिशान घर विकत घेतलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो आपल्या स्वप्नातल्या घराच्या शोधात होता आणि अखेर हे घर त्याला मिळाल्याचं समजतंय. पुढच्या वर्षी टायगर या नव्या घरात राहण्यास जाणार आहे.

आठ बेडरुम्स असलेलं घर घेण्याचं टायगरचं स्वप्न होतं आणि मुंबईत सहजासहजी असं घर त्याला मिळत नव्हतं. अखेर खार इथं त्याला इच्छेप्रमाणे घर सापडलं असून त्याच्या इंटिरिअर डिझाइनिंगच्या कामालाही सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे अभिनेता जॉन अब्राहमचा भाऊ अॅलेन या घराची इंटिरिअर डिझाइनिंग करणार आहे. अॅलेन स्वत: इंटिरिअर डिझायनर असून त्याने याआधीही बऱ्याच सेलिब्रिटींचे घर डिझाइन केले आहेत.

वाचा : पाकिस्तानी चित्रपटात भूमिका साकारणारा तो रणवीर नव्हेच? 

टायगरच्या ‘बागी २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर जबरदस्त कमाई केली होती. यामध्ये त्याची प्रेयसी दिशा पटानीसुद्धा झळकली होती. सध्या तो ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटातून आहाना पांडे आणि तारा सुतारिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.