सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घौडदौड अजूनही सुरूच आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत ३००.८९ कोटींची कमाई केली असून हा आकडा अजूनही वाढणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
चित्रपट प्रदर्शनानंतर तीन आठवड्यांतच ‘टायगर जिंदा है’ने भरघोस कमाई केली आहे. त्यामुळे ‘भाईजान’ सलमानसाठी गेल्या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात ही सर्वोत्तम झाली असं म्हणायला हरकत नाही. सलमानचा अॅक्शन अवतार, कतरिनासोबतची केमिस्ट्री आणि पाच वर्षांनंतर सलमान- कतरिनाची हिट जोडी पडद्यावर आल्याने प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच अनेकांच्या तोंडून चित्रपटाबद्दल प्रशंसा ऐकायला मिळत असल्याने त्याचाही चांगलाच फायदा झाला. जागतिक पातळीवरही सलमानच्या या चित्रपटाच्या कमाईचे आकडे लक्ष वेधत असून आमिरच्या ‘३ इडियट्स’ या चित्रपटाला ‘टायगर’ने पिछाडले आहे.
https://twitter.com/taran_adarsh/status/949923433520840704
वाचा : ‘पॅडमॅन’ला टक्कर देण्यासाठी ‘पद्मावत’ सज्ज
सलमानने त्याच्या ‘सुलतान’ या चित्रपटाच्या तीन आठवड्यांच्या कमाईचा रेकॉर्ड मोडला आहे. गेल्या वर्षी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाने मात्र अपेक्षेप्रमाणे कमाई केली नव्हती. त्यामुळे सलमानसोबत प्रेक्षकांचीही निराशा झालेली. त्यामुळे ‘टायगर जिंदा है’ने घेतलेली झेप ही विशेष महत्त्वपूर्ण ठरली.