सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी त्याच्या अडचणी मात्र वाढण्याची शक्यता आहे. कारण जयपूरमध्ये या चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे. विरोधाचे कारण म्हणजे प्रमोशनदरम्यान एका टीव्ही कार्यक्रमात आक्षेपार्ह शब्द वापरल्याने वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या समाजाकडून आता सलमानच्या चित्रपटाचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

जयपूरमधील चित्रपटगृहाबाहेरील ‘टायगर जिंदा है’चे पोस्टर्स जाळण्यात आले असून त्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वाल्मिकी समाजाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सलमानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिल्पावरही आक्षेपार्ह टीप्पणी करत वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सलमानविरोधात दाखल झालेल्या तक्रारींवरुन आयोगाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून सात दिवसांच्या आत उत्तर मागितले आहे.