‘टायगर जिंदा है’ ट्रेलरमध्ये गोळीबार, घोडेस्वारी तसेच धुर्त खेळांचा भरणा आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ त्यांच्या चाहत्यांचे या सिनेमामार्फत मनोरंजन करायला पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अली अब्बास जफरने सलमानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.

अली म्हणाला की, ‘सलमानकडून ज्या पद्धतीची शिवीगाळ मी ऐकली ते मी तुम्हाला सांगूही शकत नाही. तो माझा तिरस्कार करायचा. तो नेहमी बोलायचा की, ‘तू ‘सुलतान’मध्ये जेवढं काम करुन घेतलं नाहीस त्याहून जास्त काम आता करायला लावतोयस. पण त्याला माहित होतं की त्याची व्यक्तिरेखा पाहता त्याच्यावर काम करणे तेवढेच महत्त्वाचे होते.’ अली अब्बास जफरने सलमानसोबत ‘सुलतान’मध्ये काम केले आहे.
या सिनेमाचे तुझ्यावर दडपण आहे का? असा प्रश्न जफरला विचारला असता त्याने होकारार्थी उत्तर दिले. ‘हो, हे खरंय की सध्या माझ्यावर सिनेमाचे दडपण आहे. एका हिट सिनेमाचा जेव्हा सिक्वल येतो तेव्हा त्याचे दडपण प्रत्येक दिग्दर्शकावर असते. लोकांच्या त्या सिनेमाकडून फार अपेक्षा असतात.’

‘टायगर जिंदा है’ या सिनेमाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. सिनेमासाठी खास आंतरराष्ट्रीय दर्जाचे अॅक्शन कोरिओग्राफर टॉम स्ट्रथर्स आणि त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा सिनेमा २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’चा सिक्वल आहे. मंगळवारी या सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर सिनेमाचेच नाव ट्रेण्डमध्ये होते. यावरुन या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये असणारी क्रेझ दिसून येते.

‘शिकार तो सब करते हैं, लेकिन टाइगर से बेहतर शिकार कोई नहीं करता।’ ही ट्रेलरची पंचलाइनही फार हिट झाली आहे. २५ भारतीय परिचारिकांचे अपहरण करण्यात आलेले असते. त्यांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्याचे काम टायगर अर्थात सलमानवर असते. या मोहिमेत तो कसा यशस्वी होतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

Story img Loader