भारतीयांच्या पसंतीस उतरलेली रम म्हणून ‘ओल्ड मंक’ लोकप्रिय आहे. या ब्रँडला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवणारे पद्मश्री ब्रिगेडिअर (निवृत्त) कपिल मोहन यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. २०१५ मध्ये या ब्रँडवर आधारित एक लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला. ‘मंक’ असे शीर्षक असलेला हा लघुपट पुन्हा एकदा ट्रेण्डमध्ये आला आहे.
संजय मिश्रा आणि जीतू शास्त्री यांची मुख्य भूमिका असलेल्या लघुपटाची कथा या दोघांमधील मैत्रीभोवती फिरणारी आहे. ज्यावेळी ‘ओल्ड मंक’ हा ब्रँड बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते, त्याचदरम्यान ‘स्विच ऑफ फिल्म्स’ निर्मित हा लघुपट प्रदर्शित झाला.
‘स्क्रोल डॉट इन’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत या लघुपटाचे दिग्दर्शक यश वर्मा म्हणाले की, ‘भारतात बिअर, व्हिस्की, वोडक हे प्रकार प्रचलित असतानाच ओल्ड मंकचाही त्यात समावेश झाला. दशकानुदशकं रम म्हटलं की ओल्ड मंक, हे जणू काही एक वेगळं समीकरणच तयार झालं होतं. ही फक्त रम नव्हे तर, आजोबांच्या पिढीच्या आठवणींना उजाळा देणारं इंधन आहे असं म्हणायला हरकत नाही. मुळात त्या आठवणी आपल्यालाही फार आनंदित करुन जातात हेसुद्धा खरं. ही फक्त रम नव्हे, तर मैत्रीच्या नात्याला अधिक दृढ करणारं आणि दोन पिढ्यांमधील अंतर मिटवणारं एक पेय आहे. इतर कोणत्याही मद्याला जे आजवर जमलं नाही आणि जमणारही नाही ते ओल्ड मंकने केलं आहे.’ संजय मिश्रा आणि शास्त्री यांच्या खऱ्या आयुष्यातील अनुभवांवर या लघुपटातील संवाद आधारलेला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
वाचा : ‘ओल्ड मंक’बद्दल तुम्हाला या १० गोष्टी ठाऊक आहेत का?
कपिल मोहन हे १९६५ च्या आधीपासून ट्रेड लिंक्स प्रा. लि.चे प्रमुख होते. त्यांनी डायर मीकिन ब्रेव्हरेजची धुरा सांभाळल्यानंतर कंपनीचा विविध क्षेत्रात विस्तार केला होता. कपिल मोहन यांनी या कंपनीची धुरा सांभाळल्यानंतर ‘ओल्ड मंक’ रम भारतातच नव्हे तर जगात लोकप्रिय झाली झाली होती.