सलमानचा चित्रपट म्हटलं की त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केलीच पाहिजे. त्याच्या चित्रपटांनी आजवर केलेली कमाई पाहता त्याच्याकडे जणू यशाचा फॉर्म्युला आहे असं म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही. याचच उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. त्याच्या ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून केवळ सात दिवसांमध्ये यावर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाला (गोलमाल अगेन) मागे टाकलं.

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक था टायगर’चा सिक्वल असलेल्या ‘टायगर जिंदा है’ने आठवड्याभरातच २०० कोटींचा गल्ला पार करत २०६.०४ कोटींची कमाई केली. सलमान, कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘टायगर जिंदा है’ हा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा एकमेव चित्रपट नसून, याआधी एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २ द कन्कल्युजन’च्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचल्याचं पाहायला मिळालं होतं.

सध्या बॉलिवूडमध्ये कोणतेही मोठे चित्रपट प्रदर्शित न झाल्याचाही ‘टायगर जिंदा है’ला फायदा झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार, चित्रपटाने शुक्र. ३४.१०, शनि. ३५.३०, रवि. ४५.५३, सोम. ३६.५४, मंगळ. २१.६०, बुध. १७.५५, गुरु. १५.४२ अशी २०६.०४ कोटी रुपयांची कमाई केली. तेव्हा आता हा चित्रपट ३०० कोटींचा गल्ला जमवतो का, याकडेच अनेकांचं लागून राहिलं आहे. त्यातही सलमानचा गुरुवारीच वाढदिवस झाला. त्यामुळे बॉलिवूडच्या भाईजानला प्रेक्षकांनी चांगलेच गिफ्ट दिले असं म्हणायला हरकत नाही.