टीव्हीवर एखाद्या जाहिरातीत खोडकर मुलांना समज द्यायला प्रत्यक्ष ‘मदर इंडिया’ नर्गिस दत्त आली किंवा ‘मोगॅम्बो खूष हुआ..’ असे म्हणत तब्बल १२ वर्षांनी काळा-सोनेरी सूट घातलेल्या अमरीश पुरींचेच दर्शन झाले तर आश्चर्याचा सुखद धक्का कोणत्या सिनेप्रेमीला बसणार नाही. प्रत्येक सिनेप्रेमीला आपले लाडके कलाकार, त्यांनी पडद्यावर जिवंत केलेली पात्रे कायम आपल्यासोबत राहावी असेच वाटते. राज कपूर, देव आनंद, मधुबाला, मीना कुमारी, शशी कपूर असे अनेक लोकप्रिय कलाकार आज आपल्यात नाहीत. मात्र सध्याच्या तंत्रज्ञांनी अत्याधुनिक ‘व्हीएफएक्स’ तंत्राच्या माध्यमातून आता आपल्या लाडक्या कलाकारांना पुन्हा जिवंत करण्याची किमया साध्य केली आहे. सध्या तरी ही किमया हॉलीवूडपुरती मर्यादित असली तरी लवकरच ती बॉलीवूडमध्येही पाहता येईल, अशी आशा करायला हरकत नाही.

‘व्हीएफएक्स’ तंत्राचा सर्वाधिक कस लागतो जिवंत माणसाच्या निर्मितीत आणि हा माणूस केवळ आपल्यासारखा दिसून चालत नाही तर त्याचे चालणे, बोलणे, वागणेही आपल्यासारखेच असावे लागते, असे मत प्रसिद्ध हॉलीवूड तंत्रज्ञ माईक मॅकगी यांनी मांडले. माईक हे ऑस्कर पुरस्कारप्राप्त ब्रिटिश स्टुडिओ, ‘फ्रेमस्टोर’चे प्रमुख सर्जनशील संचालक आहेत. भारत-इंग्लंड क्रिटेक परिषदेच्या निमित्ताने माईक गेल्या आठवडय़ात मुंबईत होते. या वेळेस तंत्रज्ञानाद्वारे सिनेमाच्या रुंदावणाऱ्या कक्षा यावर त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधंला. माईक यांनी ‘फ्रेमस्टोर’च्या माध्यमातून २०१४ साली ‘गॅलॅक्सी चॉकलेट’ची जाहिरात केली होती. या जाहिरातीचे मुख्य आकर्षण होती, हॉलीवूडच्या सुवर्णयुगातील प्रसिद्ध अभिनेत्री ऑड्री हेपबर्न. ऑड्री हेपबर्नच्या निधनानंतर तब्बल २० वर्षांनी माईक यांनी १९ वर्षीय ऑड्रीला पडद्यावर आणून सर्व जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता.

ऑड्री हेपबर्नचं डिजिटल प्रतिमेच्या रूपाने पुनरुज्जीवन केलं गेलं तशीच आणखी एका प्रतिमेने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. २०१४च्या ‘बिलबोर्ड’ संगीत पुरस्कार सोहळ्यात पॉप संगीताचा बादशाह मायकेल जॅक्सन अवतरला. ग्राफिक्सच्या माध्यमातून बनविलेल्या मायकेलने आपल्या गाण्यावर नृत्य करत चाहत्यांची मने पुन्हा एकदा जिंकली. डिजिटल प्रतिमेद्वारे कलाकारांची निर्मिती करण्यासंदर्भात बोलताना माईक म्हणाले, हेपबर्नसारख्या लोकप्रिय कलाकारांना जिवंत करणे अतिशय जबाबदारीचे काम आहे. लोकांचे अशा कलाकारांशी विशेष नाते असल्याने निर्मितीत लहानशी जरी चूक झाली तरी पूर्ण मेहनतीवर पाणी फिरू शकते. तसेच मृत कलाकारांचे अयोग्य पद्धतीने चित्रण केले तर प्रेक्षकांबरोबरच कायद्याचा रोषही पत्करावा लागतो.

माईक यांच्या म्हणण्यानुसार हॉलीवूड कलाकारांमध्ये विशेषत: तरुण कलाकारांनी वेगवेगळ्या वयात आपले डिजिटल स्कॅनिंग करणे सुरू केले आहे. ब्रॅड पीट, जॉर्ज क्लुनी, सॅण्ड्रा बुलक, जेनिफर लॉरेन्स अशा अनेक कलाकारांनी आपले डिजिटल स्कॅनिंग करून स्वत:जवळ त्याचे हक्क ठेवले आहेत. अनेक प्रथितयश कलाकार त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या डिजिटल चित्रणाचा कसा आणि किती वापर व्हावा याकरता स्टुडिओंसोबत करारही करत आहेत.

डिजिटल चित्रणाचे वितरण आणि कराराकरता मध्यस्थी करणाऱ्या अनेक कंपन्यांचा जगभरात उदय होत आहे. मर्लिन मन्रो, इन्ग्रिड बर्गमन अशा अनेक कलाकारांच्या डिजिटल प्रतिमांच्या वितरणाचे अधिकार असलेल्या ‘सीएमजी वर्ल्डवाइड’चे अध्यक्ष मार्क रोझ्लर म्हणतात, कायद्यानुसार मृत कलाकारांच्या वारसांकडे किंवा विश्वस्त मंडळाकडे कलाकारांच्या प्रतिमेचे अधिकार असतात. त्यांच्या परवानगीशिवाय कलाकारांचा वापर करणाऱ्यांना जबर दंडाची तरतूद आहे. सध्याचे कलाकार हे त्यांच्या प्रतिमांचा मृत्यूनंतर कसा वापर व्हावा याबाबत सजग झाले आहेत.

भारतात तरी अजून कोणत्याही कलाकाराला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुरुज्जीवित करण्याचा प्रयत्न झालेला नाही. कॉपीराईटतज्ज्ञ मनोज काळे म्हणतात, ‘भारत हा आंतरराष्ट्रीय कॉपीराईट करारात सहभागी असल्याने भारतीय कलाकारही आपल्या डिजिटल प्रतिमेचे हक्क घेऊ  शकतात. मात्र कलाकार आणि त्यांच्या वेगवेगळ्या छटा दाखवण्याआधी त्यांचे अधिकार सुरक्षित ठेवणाऱ्या ठोस भारतीय कायद्याची गरज आहे. अमिताभ बच्चन आणि सन्नी देओलसारख्या कलाकारांनी आपल्या आवाजाचे मालकी हक्क घेऊन ठेवले आहेत. त्यामुळे लवकरच कलाकार आपल्या प्रतिमेचेही अधिकार घेतील. अद्याप तरी याबाबतीत पुरेशी जागरूकता निर्माण झालेली नाही.

काही कलाकार मात्र अलिप्त

हॉलीवूडमधील अनेक कलाकार आपल्या मृत्यूनंतरही आपल्या वारसांना उत्पन्न मिळावे याकरता आपल्या प्रतिमेचे डिजिटल रूपात जतन करून ठेवत असताना काही कलाकार मात्र यापासून अलिप्त राहताना दिसत आहेत. रॉबिन विल्यम्स, कॅरी फिशर या कलाकारांनी आपल्या मृत्यूनंतर आपल्या डिजिटल प्रतिमेचा वापर केला जाऊ  नये, असे आपल्या मृत्युपत्रात नमूद केले आहे.