दाक्षिणात्य सुपरस्टार एनटीआर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नंदमुरी बालकृष्ण, विद्या बालन, राणा डग्गुबती यांच्या मुख्य भूमिका आहेत. एनटीआर यांचा चित्रपटसृष्टीपासून राजकारणापर्यंतचा प्रवास या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे विद्या बालन या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
एनटीआर यांचा नोकरी सोडून अभिनय क्षेत्रातील पदार्पण आणि त्यानंतर जनसामान्यांची मनं जिंकून राजकारणात केलेला प्रवेश यामध्ये अधोरेखित करण्यात आला आहे. यामध्ये ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबत्ती आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. तर मराठी अभिनेता सचिन खेडेकर राजकीय नेते भास्करराव ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. दरम्यान, अभिनेत्री रकुल प्रीत या बायोपिकमध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या भूमिकेमध्ये झळकणार असून काही दिवसापूर्वी तिचाही लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्याचबरोबर बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता जिसू दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या एल. व्ही. प्रसाद यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे.
या बहुचर्चित बायोपिकचं दिग्दर्शक क्रीश यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांनी कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मध्येच सोडलं होतं. एनटीआर बायोपिक ९ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.