चित्रपटसृष्टीत योगदान देणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी ऑस्कर पुरस्काराचे अनन्यसाधारण महत्त्व असते. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा सोमवारी (भारतीय वेळेनुसार) लॉस अँजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर एक व्यक्ती नग्नावस्थेत धावताना या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ १९७४च्या ऑस्कर अवॉर्ड्समधील असल्याचं म्हटलं जात आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाची घोषणा करण्यासाठी अभिनेते डेव्हिड नीवेन मंचावर आले होते. ब्रिटीश अभिनेते एलिझाबेथ टेलर यांचा परिचय करून देत असतानाच त्यांच्यामागून एक व्यक्ती कोणत्याही कपड्यांविना धावत आला. विजयाची खूण दाखवत तो डेव्हिड यांच्या मागून धावत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हे पाहून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

तो व्यक्ती होता रॉबर्ट ओपेल. ऑस्करच्या इतिहासात हा प्रसंग आणि त्यानंतर व्हायरल झालेला व्हिडिओ सर्वाधिक चर्चेत राहिला. यंदाच्या ९०व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर पुन्हा एकदा तोच व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला. रॉबर्ट हा अमेरिकन फोटोग्राफर होता. या घटनेनंतर त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. ऑस्करच्या कार्यक्रमात हा प्रसंग ठरवूनच घडवण्यात आला होता, असंही म्हटलं जातं. त्यानंतर रॉबर्टने पत्रकार परिषद घेत घटनेविषयी स्पष्टीकरणही दिलं होतं.