जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सलमान खानने बॅटरीवर चालणाऱ्या सायकलचे अनावरण केले. जेव्हा सलमान खान एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये उपस्थित असतो तेव्हा पत्रकारसुद्धा त्याला अनेक प्रश्न विचारून त्यावर त्याचे मत जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतात. दबंग खानची मते आणि उत्तरे ऐकण्यासाठी प्रेक्षक आणि चाहतेसुद्धा तितकेच उत्सुक असतात. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर सलमान काय वक्तव्य करेल हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतूर असतात.
सलमानची एक्स मॅनेजर रेश्मा शेट्टी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. असं म्हटलं जातं की, सलमान आज जे यश पाहत आहे त्यामागे सलमानच्या मेहनतीसोबतच रेश्माचाही फार मोठा हात आहे. पण नऊ वर्षांचे संबंध संपवून, सलमानने रेश्माशी निगडीत सगळे करार संपवले आणि तिला कामावरून कमी केलं. त्यामुळे सलमानच्या या निर्णयामागचे कारण जाणून घेण्यासाठी पत्रकार प्रश्न विचारतील हे साहजिकच होते. मात्र सलमान या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या काही मनस्थितीत दिसत नव्हता आणि उलट त्याने पत्रकारालाच दोन शब्द ऐकवले. ‘अभी कुछ नही…पाजी ज्यादा उडो मत’ असे ठणकावत तू माझे काम मॅनेज करशील का? असा सणसणीत प्रतिप्रश्न त्याने पत्रकाराला केला. सलमान त्या पत्रकाराला नेमकं काय म्हणाला हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ…
वाचा : रितेश देशमुखने घेतली डोनाल्ड ट्रंपची अनोखी मुलाखत
सलमान खानचा आगामी चित्रपट ‘ट्युबलाइट’ २३ जून रोजी प्रदर्शित होत आहे. अमेरिकन चित्रपट ‘लिटिल बॉय’च्या कथानकाचा आधार घेत दिग्दर्शक कबीर खानने सात वर्षांनंतर सलमान आणि सोहेल खानला रुपेरी पडद्यावर एकत्र आणले आहे. त्यामुळे या दोन्ही भावांच्या नात्यातील गोडवा प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याऱ्या या बहुचर्चित चित्रपटामध्ये सलमान आणि सोहेलव्यतिरिक्त चीनी अभिनेत्री झू झू, बालकलाकार माटिन तंगू रे, ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी आणि पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत अभिनेता शाहरुख खानही झळकणार आहे.